या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्याच दिवशी ग्राहकांची गर्दी

नाशिककर खवय्यांसाठी यंदाही कोकणमेवा मुबलक स्वरूपात उपलब्ध झाला आहे.  हापुस आंब्याची गोडी चाखण्यासाठी कोकण पर्यटन विकास संस्थेच्यावतीने  आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी त्यास सुरूवात झाली.  महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आंब्याची गोडी चाखण्यासाठी खवय्यांनी गर्दी केली. नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबा कसा ओळखावा याबाबत माहिती येथे देण्यात आली आहे.

कोकण पर्यटन विकास संस्थेच्यावतीने भरविण्यात येणाऱ्या आंबा महोत्सवाचे यंदाचे १२ वे वर्ष आहे.  रत्नागिरी, मांजरे, संगमनेरे यासह लहान-मोठय़ा गावांतून १६ शेतकरी महोत्सवात सहभागी झाले आहेत. महोत्सवाचे उद्घाटन नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. मंगेश थेटे, कोकण पर्यटनचे दत्ता भालेराव उपस्थित होते. कोकण महोत्सवाला दरवर्षी मिळणारा प्रतिसाद पाहता नाशिक येथील शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाची जाहिरात, विपणन स्वत केले पाहिजे, असे दराडे यांनी सांगितले.कृषिमालाच्या भावात चढ-उतार होतो. त्यामुळे त्यावर प्रक्रिया करत नाविन्यपूर्ण पदार्थ बाजारात आणले तर परिस्थिती वेगळी असेल याचा शेतकऱ्यांनी विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. भालेराव यांनी महोत्सवाचे वेगळेपण म्हणजे सेंद्रिय पध्दतीने पिकविलेला आंबा असल्याचे सांगितले. सेंद्रिय तसेच हापुस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी संस्थेने खास माहितीपत्रक तयार केले असून नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबा कसा ओळखावा याबाबत माहिती देण्यात आली आहे. महोत्सव २१ मेपर्यंत खुला राहणार आहे.

शेतकरी ते ग्राहकसंकल्पना

महोत्सव ‘शेतकरी ते ग्राहक’ या संकल्पनेवर आधारीत असल्याने व्यवहार पारदर्शी असल्याचे विक्रेत्या प्राची नागवेकर यांनी सांगितले. ११ वर्षांंपासून महोत्सवात सहभागी होत असून नाशिकसह सांगली पुणे येथेही महोत्सवात सहभागी होतो. मात्र नाशिककरांची गोष्ट वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले.

महोत्सवात आंब्याचे दर आकारमानानुसार ३०० ते ७०० रुपये डझन आहेत.  यंदाही अक्षय्य तृतीया आणि त्यानंतरचे दोन दिवस गर्दी राहील, असा विश्वास विक्रेते किरण कुलथे यांनी व्यक्त केला.  आंबा विक्री सोबत कोकणातील रानमेवा, आवळा, कोकम अशी विविध प्रकारची पेय, मसाले या ठिकाणी उपलब्ध असून खास ‘आंबा कुल्फी’ची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा आंब्याचे मुबलक उत्पादन झाले आहे. अक्षयतृतीयेनंतर मोठय़ा प्रमाणात माल बाजारात येऊन दर खाली येतील, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mango festival in nashik
First published on: 27-04-2017 at 01:06 IST