लोकसत्ता वार्ताहर

धुळे: साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटाला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावित व भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलचा पराभव करीत बळीराजा पॅनलने १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे शिरपूर बाजार समितीत भाजपचे आमदार अमरिशभाई पटेल यांचे वर्चस्व पुन्हा सिध्द झाले. 

साक्री समितीत खा. डॉ. हिना गावित, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, आ. अमरीश पटेल, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी.एस.अहिरे, माजी आमदार वसंत सूर्यवंशी आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या अधिपत्याखाली व धुळे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांनी बळीराजा पॅनलचे नेतृ्त्व केले.

आणखी वाचा- नाशिक : दिंडोरी, सिन्नर बाजार समितीत धक्कादायक निकाल

शिरपूर समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पॅनलने सर्व १८ जागांवर दणदणीत विजय संपादन केला. आमदार अमरिशभाई पटेल यांच्या ३५ वर्षांच्या राजकीय नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून ते आजपर्यंत अमरिशभाई हे स्वतः कामानिमित्त मुंबई येथे होते. ते स्वतः या निवडणुकीत शिरपूरमध्ये नसताना देखील शिरपूर तालुक्यातील जनतेने त्यांच्या पॅनलवर विश्वास ठेवला. आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवडणूक लढविण्यात आली.