नाशिक : मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध भागातून वाहने मुंबईकडे मार्गस्थ झाल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून इगतपुरी तालुक्यात समृद्धी महामार्गावर जाणारी अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यात आली आहे. मनोज जरांगे यांनी शुक्रवारी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केले. दीड दिवसाचा गणपती साजरा करून नाशिकमधून हजारो मराठा बांधव सकाळी कालिका मातेचे दर्शन घेऊन शेकडो मोटारींमधून मुंबईकडे मार्गस्थ झाले. यात टेम्पो, बस व चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

अनेकदा निवेदने देऊनही सरकार निर्णय घेत नसल्याने जरांगे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. हे आंदोलन तीव्र केले जाईल. मागण्या मान्य होईपर्यंत मुंबईत तळ ठोकण्याचा इशारा सकल मराठा समाजाचे पदाधिकारी करण गायकर यांनी मुंबईला मार्गस्थ होताना दिला. नाशिक, धुळे व काहीअंशी जळगाव जिल्ह्यातील वाहने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ झाली.

घोटी टोल नाका ओलांडल्यावर वाहनधारकांना पिंप्री फाट्यावरून समृद्धी महामार्गावर जाता येते. मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गाला समृद्धी महामार्गाशी जोडणारा हा मार्ग आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे विविध भागातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महामार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग भिवंडी तालुक्यातील आमणे येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. आठपदरी समृद्धी महामार्गावरून भरधाव येणारे वाहनधारक चारपदरी मुंबई-आग्रा महामार्गावर आमणे येथे पोहोचल्यावर कोंडीत अडकतात. कारण, महामार्गावरील आणि समृद्धी महामार्गावरील वाहने या ठिकाणी एकत्र येतात. त्यामुळे आमणे येथेही वाहतूक कोंडी होते, अशा तक्रारी वारंवार होतात. आंदोलनामुळे कोंडीत भर पडली. ही स्थिती लक्षात घेऊन महामार्ग पोलिसांनी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून इगतपुरी तालुक्यातून समृद्धी महामार्गाकडे जाणारी अवजड वाहने रोखली. या वाहनांमुळे कोंडीत आणखी भर पडू शकते. त्यामुळे रात्री १२ वाजेपासून अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आल्याचे महामार्ग पोलीस विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक राम व्होंडे यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारपर्यंत ही स्थिती कायम होती. सुमारे १०० हून अधिक अवजड वाहने थांबविल्याने संलग्न रस्त्यावर वाहनांची रांग लागल्याचे चित्र आहे.