धुळे : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे पाच वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निघृण हत्येप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड व धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार समाजाच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. या घटनेने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट पसरली असून महिला व बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा गंभीरपणे पुढे आला आहे.
डोंगराळे (ता. मागलेगाव) येथे अवघ्या पाच वर्षे वयाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या क्रूर कृत्याचे पडसाद केवळ मालेगाव आणि परिसरातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज धुळ्यातही लोकांच्या संतापाचा बांध फुटला आणि अनेकजण रस्त्यावर उतरले. कुणी मोर्चा काढून तर कुणी लेखी निवेदनातून या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला व प्रशासनाकडे आरोपीला कठोर शिक्षा करावी अशा स्वरूपाच्या मागण्या केल्या.
अहिर सुवर्णकार समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्च्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डोंगराळे (ता. मालेगाव) येथील कारागीर जगदीश दुसाने यांच्या यज्ञा या पाच वर्षीय निष्पाप बालिकेवर नराधमाने अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले असून अशा घृणास्पद कृत्याला कठोरात कठोर शिक्षा मिळणे अत्यावश्यक आहे. आरोपीवर तातडीने खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर चंद्रकांत सोनार, नितीन विसपुते, जगदीश देवपुरकर, सुनील देवरे आणि अजय नाशिककर यांनी सह्या केल्या आहेत.
दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळानेही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. पाच वर्षांच्या निरागस चिमुकलीवर झालेला अत्याचार हा क्रौर्याची परिसीमा असून मानवतेलाच काळीमा फासणारा आहे.ही घटना पाहाता आरोपी विजय खैरनार हा विकृत मानसिकतेचा, समाजाला असुरक्षिततेकडे ढकलणारा गुन्हेगार असल्याचे अदोरेखित होते. त्याच्या या कृत्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाचा तपास कोणतीही ढिलाई न ठेवता तात्काळ पूर्ण करावा. खटला जलदगती न्यायालयात चालवून बालिकेला न्याय देण्यात यावा आणि समाजात कायद्याबाबत विश्वास निर्माण व्हावा. अशा घटना घडवीणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देणे हेच योग्य असल्याचे शिष्टमंडळाने निवेदनातून मांडले आहे. पीडित कुटुंबाला शासनामार्फत आर्थिक मदत, मानसिक आधार आणि सुरक्षा उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या निवेदनावर हेमंत भड़क, महेश पाटील, आर.वाय. महाले, बी.ए. पाटील, नाना शिरसाठ, नंदु अहिरराव, अमर फरताडे, दिनकर जाधव, मनोज रुईकर, डॉ. नागेश पाटील, नितीन जाधव, कैलास देसले, भुषण बागुल, अशोक जाधव, उदय पवार, शाम बोरसे, जितेंद्र पाटील, विकास जिवरक आणि धनंजय गाळनकर यांची नावे आहेत.
घटनेचे पडसाद : प्रशासन, राज्यकर्ते आणि सामान्यांसह साऱ्यांनाच धक्का
ही निघृण घटना बालकांच्या सुरक्षिततेबाबत अधिक कडक उपाययोजना, कठोर कायदे आणि तातडीची न्यायप्रक्रिया यांची गरज अधोरेखित करणारी ठरली आहे. समाजातील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने अधिक सक्षम पावले उचलण्याची मागणी होत आहे. या घटनेनंतर डोंगराळेसह परिसरात तीव्र असंतोषाची भावना प्रखर झाली आहे. वेगवेगळ्या गावांचे नागरिक, महिला बचाव समित्या, विविध सामाजिक संस्था आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडूनही निषेध नोंदविण्यात येत आहे. गावातील महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, महिला हेल्पलाइन आणि तातडीच्या पथकांची व्यवस्था वाढविण्याची गरज यनिमित्त व्यक्त होते आहे.
दरम्यान, या क्रूर घटनेमुळे मानसिक धक्का बसलेल्या पीडित कुटुंबाला मानसिक धक्यातून सावरण्यासाठी समाजाच्या विविध घटकांतून प्रयत्न होत आहेत. या घटनेने निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या वातावरणामुळे प्रशासनाने ग्रामीण भागातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्याचे संकेत दिले असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची तयारीही करण्यात येत आहे.
