धुळे – आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सर्व पक्ष तयारीला लागले असताना धुळे शहरातील मुस्लिम भागात वर्चस्व असणाऱ्या एमआयएम (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या पक्षाच्या शहरासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. नागरी समस्या सोडविण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष होत असल्याचे कारण राजीनामा दिलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून पुढे करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी धुळ्याचे एमआयएमचे माजी आमदार डॉ. फारुख शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. फारुख शाह यांना ८० हजाराहून अधिक मते मिळाली होती. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) अनिल गोटे उमेदवार होते. त्यांच्याविरोधात महायुतीतून भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल होते. तिरंगी लढतीत भाजपचे अनुप अग्रवाल यांचा दणदणीत विजय झाला. २०१९ च्या निवडणुकीत फारुक शहा हे ४६ हजार ६७९ मते मिळवून विजयी झाले होते.

धुळे शहर विधानसभा मतदारसंघात २००९ मध्ये लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमातून अनिल गोटे हे ५९ हजार ५७६ मतांनी विजयी झाले होते. तर २०१४ साली अनिल गोटे यांनी ५७ हजार ७८० मते मिळवत विजय प्राप्त केला होता. २०१९ च्या निवडणुकीत एमआयएमचे आमदार फारुक शहा हे ४६ हजार ६७९ मते मिळवत विजयी झाले होते.

धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून प्रथमच मुस्लिमधर्मीय उमेदवार विजयी झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. सुमारे ६० टक्के हिंदूबहुल असलेला धुळे शहर विधानसभा मतदारसंघ एमआयएमच्या ताब्यात गेल्याने एमआयएमने जिल्ह्यातील ग्रामीण भागातही हातपाय पसरविण्यास सुरुवात केली होती. हिंदू मतदारांनाही आपलेसे करण्याचे प्रयत्न डाॅ. फारुख शाह यांच्याकडून झाले.

परंतु, मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर डाॅ. फारुख शाह यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने एमआयएमला धक्का बसला. त्यानंतर आता एमआयएमचे जिल्हाध्यक्ष मुक्तार बिल्डर, शहराध्यक्ष फातिमा अन्सारी, युवा अध्यक्ष रफिक पठाण यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीने आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला. राजीनाम्याचे पत्र महिला जिल्हाध्यक्ष दीपश्री नाईक यांच्याकडे सादर करण्यात आले.

राजीनामा पत्रात पदाधिकाऱ्यांनी, शहरातील विविध समस्या सोडविण्याबाबत वरिष्ठ पातळीकडून दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी कोणताही ठोस पुढाकार घेतला जात नसल्याने नागरिकांत नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, आम्ही सर्वांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून, हा निर्णय नासिर पठाण यांना पत्राद्वारे कळविण्यात आला आहे, असे स्पष्ट केले. राजीनामा देणाऱ्यांमध्ये युवा अध्यक्ष रफिक पठाण, स्टुडंट युवा अध्यक्ष आकीब सय्यद, महिला शहराध्यक्ष फातिमा अन्सारी, जिल्हा उपाध्यक्ष प्यारेलालदादा पिंजारी आणि कैसर अहमद, शहर कार्यकारी अध्यक्ष अझहर सय्यद, वाहतूक जिल्हाध्यक्ष माजिद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष इकबाल शहा, सचिव फारुख अन्सारी, उपाध्यक्ष सहेजाद मंसूरी, तसेच महिला पदाधिकारी सहेदा अन्सारी, मैमुना अन्सारी, अखिला सय्यद, रेहाना पिंजारी यांचा समावेश आहे.