नाशिक : भाजप-शिवसेनेची जेव्हा पहिल्यांदा युती झाली, तेव्हा ती प्रयत्नपूर्वक घडवून आणावी लागली होती. नैसर्गिक युती होण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, असा टोला राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री उदय सामंत यांना हाणला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक दौऱ्यात भाजप-शिवसेनेची नैसर्गिक युती असून राष्ट्रवादीशी (अजित पवार) जुळवून घेणे ही राजकीय तडजोड असल्याचे म्हटले होते. त्यांच्या विधानाची भुजबळ यांनी खिल्ली उडवली.
नैसर्गिक काय, अनैसर्गिक काय असते हे त्यांच्याकडून जाणून घेईन. १९८८-८९ मध्ये भाजप-शिवसेनेची युती झाली. तेव्हा शिवसेना प्रांतिक तर भाजप राष्ट्रीय पक्ष असल्याने भाजपमधून काहींचा तिला विरोध होता. भाजपचे प्रमुख नेते तथा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सूचनेनुसार अखेर ही युती झाली. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली. नंतर राज्यातील भाजपचे तत्कालीन नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासह शिवसेनेतील आपल्यासह अन्य नेत्यांनी महिनाभर एकत्रित बसून ही युती घडवून आणली. शिवसेना-भाजपला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावे लागले. नैसर्गिक युतीसाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. ती आपोआप होते, असे भुजबळ यांनी नमूद केले.