नाशिक : मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयीन आस्थापनाकडे पत्रव्यवहार करत कुठे राहायचे, याविषयी माहिती दिली. घर रिकामे असेल तर राहण्यास जाईल ना ? याविषयी कोणालाही काहीच बोललेलो नाही. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री याविषयी निर्णय घेतील, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली.
येथे भुजबळ यांनी अद्याप मुंबईत शासकीय निवासस्थान मिळाले नसल्याविषयी माहिती दिली. २० मे रोजी शपथ घेतल्यानंतर मंत्रालयीन व्यवस्थापनाकडून याविषयी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार शासकीय निवासस्थान देण्यात आले. परंतु, त्या ठिकाणी दुसरे कोणीतरी राहत आहे. ते आमचे सहकारी आहेत. त्यांना घर खाली करा, असे काहीही सांगितले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याविषयी निर्णय घेतील. त्यांना अन्य कुठे शासकीय निवासस्थान असेल तर द्यावे, असे त्यांना सुचविले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
ठाकरे बंधु हे मुंबई महापालिका निवडणुकीपुरते तरी एकत्र येतील . इतर ठिकाणी ते एकत्र येणे कठीण आहे. प्रत्येक ठिकाणी आपली ताकद पाहावी लागते. त्यानुसार पुढील नियोजन होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्षांबरोबर काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवली जाईल, असे सांगितले आहे. सरकार कोणाचेही असो मराठी आपली राजभाषा आहे. तिचा सन्मान जपला जाईल, असेही भुजबळ यांनी नमूद केले.
मंत्री संजय शिरसाठ यांच्या म्हणण्याचा अर्थ हा पैसा सर्व जनतेच्या बापाचा म्हणजे जनतेचा आहे. तो कोणा एका मंत्र्याचा किंवा अधिकाऱ्याचा नाही, असा आहे. मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. परंतु, ते आंदोलन कशासाठी करतात, हे माहिती नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडली असतानाही आंदोलन का होते, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला.