जळगाव – जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात पाळधी येथे दूरक्षेत्र पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत असताना ज्या पोलीस ठाण्याच्या जेलमध्ये नेहमी जायचो, त्याचीच इमारत बांधण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझ्यावर आली. यापेक्षा दुसरा आनंद नसल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर सुमारे चार कोटी २३ लाख रूपयांच्या निधीतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात दूरक्षेत्र पोलीस ठाण्याची इमारत बांधण्यात आली आहे. सुमारे पाच हजार चौरस फूट जागेवर आकारास आलेल्या त्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

१४ प्रशस्त दालनांची सोय असलेल्या पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याच्या इमारतीत लिफ्टसह सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टींग, वातानुकुलित कार्यालयीन व्यवस्था करण्यात आली आहे. या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांनी केले असता, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक कविता नेरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, पाळधीचे सरपंच विजय पाटील, उद्योजक दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

बाहेर सगळीकडे बोलताना मला कोणतीच अडचण येत नाही. परंतु, स्वतःच्या गावात बोलताना माझी मोठी अडचण होते. पाळधी गावानेच मला लहानाचे मोठे केले आहे. ज्या पोलीस ठाण्यात मी नेहमी आंदोलने करून जेलमध्ये जायचो, त्याचीच इमारत बांधण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझ्यावर आली. यासारखा आनंदाचा दुसरा दिवस नाही, असे मंत्री पाटील गर्वाने म्हणाले.

१९८४-८५ मध्ये राजकारणाची सुरूवात केली तेव्हा पहिल्यांदा शिवसेनेची शाखा पाळधी गावात सुरू झाली होती. त्यावेळी वाटले नव्हते आणि मनाला देखील पटत नाही की एक दिवस मी मंत्री होईल म्हणून. पाळधी गावातील सर्वाधिक टवाळ, अशी माझी ख्याती होती. ते सगळ्या गावाने पाहिले आहे. याच गावाने मला राजकारणात नेहमीच मोठे पाठबळ दिले. याचा अभिमान वाटतो, अशीही आठवण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढली.

गुलाबराव पाटलांची कारकीर्द

गुलाबराव पाटील यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून प्रेरित होऊन वयाच्या २५ व्या वर्षी धरणगाव तालुक्यातील त्यांच्या पाळधी गावात शिवसेनेची शाखा स्थापन केली होती. त्यांची राजकारणाची सुरूवातही शाखा प्रमुख म्हणूनच झाली. १९९१ मध्ये बाळासाहेबांच्या सभेत पाटील यांना बोलण्याची पहिली संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी केलेले तडाखेबाज भाषण ऐकून बाळासाहेबांनी देखील त्यांचे कौतुक केले होते. तेव्हापासूनच खान्देशची मुलुख मैदान तोफ, अशी ओळख त्यांना मिळाली, ती आजतागायत कायम आहे.

अनेक वर्ष विरोधी पक्षात राहिल्यानंतर त्यांनी शेतीप्रश्नी बरीच आंदोलने केली. अनेक गुन्हे त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसांत नोंदवले गेले. वेळप्रसंगी त्यांना कारावासही भोगावा लागला. १९९९ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेकडून एरंडोल विधानसभा मतदारसंघात त्यांनी विजय मिळवला होता. २००९ चा अपवाद वगळता जळगाव ग्रामीणमधून ते सातत्याने विजयी होत आहेत. शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतरही त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली.