जळगाव : जामनेर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण आणि रस्त्यांचे ई-भूमिपूजन रविवारी पार पडले. भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महायुतीच्या जिल्ह्यातील इतर घटक पक्षांनी फार महत्व मात्र दिले नाही. परिणामी, महायुतीत गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेले तीव्र मतभेद चांगलेच चव्हाट्यावर आले.

मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील तोंडापूर आणि फत्तेपूर या गावांमध्ये राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्या हस्ते रविवारी आयोजित केले असताना, हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर असलेल्या जळगाव जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे भूमिपूजन देखील मंत्री भोसले यांनी केले. ज्यामध्ये जामनेरसह जळगाव, धरणगाव, यावल, चोपडा, अमळनेर, पारोळा, एरंडोल तालुक्यातील बऱ्याच रस्त्यांचा समावेश होता. आश्चर्याची बाब म्हणजे यापूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भूमिपूजन केल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झालेल्या रस्त्यांचेही सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते यावेळी पुन्हा ई-भूमिपूजन करण्यात आले.

श्रेय घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वी भूमिपूजन झालेल्या रस्त्यांचे दुसऱ्यांदा भूमिपूजन करण्यासाठी केलेला खटाटोप लक्षात घेता वैयक्तिक पालकमंत्री पाटील कमालीचे नाराज झाल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे कार्यक्रम पत्रिकेत प्रमुख उपस्थितांमध्ये नाव असतानाही पाटील यांनी जामनेरकडे फिरकणे टाळले. वास्तविक ते रविवारी दिवसभर जळगावमध्येच होते. आणि त्यांनी कृषी विभागाच्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटनही केले. आपले नेते दुखावले गेले आहेत म्हटल्यावर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील, चंद्रकांत सोनवणे, अमोल पाटील आणि चंद्रकांत पाटील हे चौघे देखील कार्यक्रम पत्रिकेत नाव असताना जामनेरमध्ये उपस्थित राहिले नाहीत.

हनी ट्रॅपसह पुणे रेव्ह पार्टी प्रकरणावरून एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांना मंत्री गिरीश महाजन यांच्यासह चित्रा वाघ आणि रूपाली चाकणकर यांनी सगळ्यांनी लक्ष्य केले आहे. त्याविषयी नाराजी व्यक्त करतानाच महाजन आणि खडसे यांच्यातील हा वाद कुठेतरी थांबला पाहीजे, अशी भावना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी जळगावमध्ये नुकतीच व्यक्त केली. त्यानंतर दोनच दिवसात जामनेर तालुक्यात मंत्री महाजन यांच्या पुढाकारातून रविवारी मोठा कार्यक्रम आयोजित केला असता, रक्षा खडसे यांनी तिकडे पाठ फिरवली. भुसावळमध्ये नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचे स्वागत केल्यानंतर त्या परस्पर निघून गेल्या. जामनेरमधील कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ, भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि सुरेश भोळे हे तेवढे उपस्थित होते.