पिंपळगाव बसवंत – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांची बहुमताने निवड झाली तर उपसभापतिपदी जगन कुटे यांची बिनविरोध निवड झाली.

सभापतिपदाची पुनश्च संधी मिळाल्याने सहा महिन्यांचा प्रशासकीय कार्यकाळ वगळता यापूर्वी २३ वर्षे व पुढील पाच वर्षे असे २८ वर्षे बाजार समितीचे सभापतिपद भूषविण्याचा मान बनकरांना प्राप्त होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत गटातील फेर मतमोजणीच्या मुद्यावर सभापती निवडीला स्थगिती द्यावी म्हणून माजी आमदार अनिल कदम गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने स्थगितीस नकार दिल्याने नियोजित कार्यक्रमानुसार सभापती, उपसभापती निवडीसाठी संचालकांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी सविता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात पार पडली.

हेही वाचा – धुळे: सुरक्षारक्षकाला कोंडून मंदिरात चोरी; सात लाख रुपयांचा ऐवज लंपास

सभापतिपदासाठी माजी आमदार अनिल कदम गटाकडून गोकुळ गिते यांचा अर्ज दाखल करण्यात आला. कदम गटाकडून मतदान गुप्त पद्धतीने घेण्याची लेखी मागणी करण्यात आली. त्यानुसार १८ मतपत्रिका तयार करून गुप्त मतदान घेण्यात आले. त्यात बनकर यांना ११ तर गिते यांना सहा मते मिळाली. यतीन कदम तटस्थ राहिले. ११ मते मिळाल्यामुळे बनकर यांची सभापती म्हणून निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

हेही वाचा – नाशिक बाजार समिती सभापतीपदी पुन्हा देविदास पिंगळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपसभापतिपदासाठी कुटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. नूतन सभापती आमदार बनकर यांचा अनिल कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, या निवडणुकीत घोडेबाजाराची चाहुल लागताच आमदार बनकर यांनी आपल्या गटाच्या आठ ते नऊ संचालकांना १० दिवसांपासून पर्यटनस्थळी रवाना केले होते. शनिवारी सकाळी या संचालकांचे बनकर यांच्या निवासस्थानी खास वाहनातून आगमन झाले. आमदार बनकर यांच्या निवासस्थानाला पोलिसांचा अक्षरशः गराडा पडला होता.