नाशिक : ‘वॉटरग्रेस प्रोडक्ट्स’ कंपनीने बेकायदेशीरपणे कामावरून काढल्याने उपासमारीचे संकट ओढावलेल्या सफाई कामगारांना न्याय द्यावा, या मागणीसाठी मनसेच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांनी कुटुंबियांसह महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणास सुरूवात केली. मुख्यमंत्री, पालकमंत्री, मनपा आणि पोलीस प्रशासन, न्यायालय आदी विविध स्तरावर दाद मागूनही कामगारांना न्याय मिळाला नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग अनुसरावा लागल्याचे मनसेने म्हटले आहे.

मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर, माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख, महिला सेना प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे आदींच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळपासून सफाई कामगारांनी उपोषणाला सुरूवात केली. वॉटरग्रेस कंपनीतील कंत्राटी कामगारांनी मनसे कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारल्याचा राग धरून ठेकेदाराच्या सहकाऱ्यांनी तीन कामगारांना पखाल रस्त्यावरील कार्यालयात बोलावून जबर मारहाण केली होती. मारहाण करणाऱ्या संशयितावर विविध पोलीस ठाण्यात लूट, जबरी मारहाण, खुनाचा प्रयत्न आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कैलास मुदलीयार आणि त्याच्या साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाईच्या मागणीसाठी मनसेकडून पाठपुरावा केला जात आहे.

हेही वाचा >>> धुळे मनपा सेवेत हद्दवाढीतील ७० कर्मचारी समाविष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वॉटरग्रेस कंपनीकडून मनपाच्या अटी आणि शर्तींचा भंग करून महानगरपालिका व कामगारांची आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याची तक्रार मनसेने मुख्यमंत्री व पालकमंंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. कामगारांना नियमाुसार वेतन न देता त्यातील काही रक्कम रोख स्वरुपात परतावा म्हणून परत घेतली जाते. मनपा कामगारांना झाडू, बूट, रेनकोट व अन्य साहित्याचे पैसे देते. पण, ठेकेदार ते कामगारांना स्वत:च्या पैश्याने हे साहित्य आणायला भाग पाडतात. ठेकेदाराने कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीतही अनेक महिने पैसे भरलेले नाहीत. कंपनीने ४५० ते ५०० कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून काढले. या संदर्भात आंदोलने व मनपा आयुक्तांशी चर्चा करूनही त्यांना न्याय मिळाला नसल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. त्यामुळे कामगारांना न्याय मिळण्यासाठी अखेर महात्मा गांधी यांनी दाखविलेल्या आमरण उपोषणाच्या मार्गाचा अवलंब करावा लागल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. उपोषणात समाधान चव्हाण, गणेश दातीर, किशोर जाधव यांच्यासह २५० कामगार त्यांच्या कुटुंबियही सहभागी झाले आहेत.