जवळपास वर्षभरानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे धार्मिक तीर्थाटनाच्या निमित्ताने शहरात आगमन झाले. शनिवारी सकाळी शिर्डी येथे राज यांनी सपत्नीक साई मंदिरात दर्शन घेतले. दुपारी विमानाने शहरात आले. रविवारी वणी गडावरील सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन ते पुन्हा मुंबईला परतणार आहेत. देवदर्शनासाठीच्या या दौऱ्यात राज यांनी पदाधिकारी बैठक वा कुठलाही राजकीय कार्यक्रम ठेवलेला नाही. प्रसारमाध्यमांशी संवाद साधणे त्यांनी टाळले.

हेही वाचा >>> नाशिक : सोनसाखळी खेचण्यात आता महिलांचाही सहभाग ; कोणार्कनगरातील प्रकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन १२ महिन्यांपूर्वी मनसेने शहर कार्यकारिणीत फेरबदल केले होते. नवी कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी राज हे नाशिकला आले होते. नंतर आजारपणामुळे त्यांना नाशिकसह अन्यत्र भ्रमंती करणे शक्य झाले नव्हते. आजारपणातून बरे झाल्यानंतर राज हे प्रथमच दोन दिवसीय नाशिकच्या खासगी दौऱ्यावर आले आहेत. मुंबईहून विमानाने ते सकाळी शिर्डीला गेले. साई मंदिरात दर्शन व आरती केल्यानंतर ते विमानाने ओझर विमानतळावर उतरले. त्यांच्यासमवेत शर्मिला ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगांवकर, महिला सेनेच्या अध्यक्ष रिटा गुप्ता, हर्षल देशपांडे आदी उपस्थित होते. शहरात राज यांचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष दिलीप दातीर, महिला सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे आदींनी स्वागत केले. या दौऱ्यात कुठलीही राजकीय बैठक होणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी राज हे वणी गडावर सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. तेथून ते ओझर विमानतळावर जातील आणि मुंबईला रवाना होतील. हा राजकीय दौरा नसून ठाकरे हे केवळ देवदर्शनासाठी आल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.