नाशिक : शहरासह नाशिक जिल्ह्यात काही वर्षांपासून बिबट्यांचा संचार आणि पशुधनासह मानवी वस्तीवरील हल्ले वाढल्याने शेत शिवारातील लोकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. २०२१-२०२५ या पाच वर्षात आतापर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नाशिक जिल्ह्यात ३५ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू तर, ६२ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले. बिबट्यांमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी सरकारने आतापर्यंत सुमारे सहा कोटीेंपेक्षा अधिक रुपयांची भरपाई वितरित केली आहे. जिल्ह्यात कायमच कुठे ना कुठे बिबटे पिंजऱ्यात जेरबंद होत असतानाही बिबट्यांचे हल्ले वाढतच असल्याने खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र सरकारलाच याप्रश्नी साकडे घातले आहे. त्यांनी त्यासाठी अनोखा उपायही सुचविला आहे.

नाशिक जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे पशुधनाचे नुकसान होत आहे.त्यातच बिबट्यांच्या भीतीमुळे शेतीकडेही दुर्लक्ष होत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकजवळील वडनेर गेट परिसरात दोन वर्षीय बालकाला बिबट्याने ओढून नेले. त्याच्या मृत्युमुळे देवळालीगाव, पिंपळगाव खांब आणि वडनेर गेट परिसरातील नागरिकांनी आंदोलन करत वनविभागाविरोधात रोष व्यक्त केला होता.

यावर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यात नाशिकजवळील वनारवाडी परिसरात तीन बिबटे तर, मागील आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तीन बिबटे जेरबंद झाले. बिबट्यांच्या हल्ल्यांमागील कारणांची सखोल तपासणी करणे, बिबट्यांचा अधिवास आणि मानवी वस्त्यांमधील सीमारेषा अधिक स्पष्ट करणे, वनविभागाची साधनसामग्री व मनुष्यबळ तातडीने सक्षम करणे आवश्यक आहे. अन्यथा समस्या अधिक गंभीर होऊ शकते, असा इशाराही खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी खासदार वाजे यांी काही उपाययोजनाही सुचविल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील ‘लेपर्ड सफारी प्रोजेक्ट’, साताऱ्यातील “माणिकडोह रेस्क्यू सेंटर” आणि राजस्थानमधील “जयपूर लेपर्ड रिझर्व्ह” यांच्या धर्तीवर लेपर्ड सफारी आणि संवर्धन प्रकल्प नाशिकमध्येही उभारण्याची सूचना खासदार वाजे यांनी केली आहे. असे केल्यास पर्यावरणीय संतुलन राखण्यासह पर्यावरण शिक्षण, स्थानिकांना रोजगार आणि पर्यटनाला चालना मिळू शकेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षितता मिळावी, निसर्गाशी असलेले संतुलन पुनर्स्थापित व्हावे, हीच इच्छा असल्याचेही खासदार वाजे यांनी नमूद केले आहे. नाशिकसाठी स्वतंत्र ‘लेपर्ड सफारी अँड कन्झर्व्हेशन प्रोजेक्ट’ मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे.