नंदुरबार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने येथे आयोजित पथ संचलनादरम्यान शनिवारी वादळी वारा आणि त्यानंतर मुसळधार पाऊस सुरु झाला. परंतु, संघ कार्यकर्त्यांनी संचलनात कुठेही खंड न पडू देता संचलन सुरुच ठेवले. या कृतीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीची प्रचिती सर्वांना आली. वादळी पावसातही सुरु राहिलेल्या या पथ संचलनाने नागरिकांचे चांगलेच लक्ष वेधले असून पावसातही त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने नंदुरबार शहरात सायंकाळी पथ संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर परिसरात यासाठी दुपारी चार वाजेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जमण्यासाठी सुरवात झाली होती. शताब्दी वर्षानिमित्ताने संचलन असल्याने संघ कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी जमली.
सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथ संचलनाला सुरवात झाली. मात्र पथसंचलन सुरु होण्याच्या वेळी आकाशात काळे ढग दाटून आले. संचलन सुरु होवून दहा ते पंधरा मिनिटे होत नाही तोच नंदुरबार शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले. नवरात्री निमित्ताने सुरु असलेल्या यात्रेदरम्यान टाकलेले मंडपही उडून गेले. मात्र अशाही जोरदार पावसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आपले पथसंचलन न थांबवता सुरुच ठेवले. ठरलेल्या बॅड पथकाच्या तालावर हातात काठी घेवून वादळी वाऱ्यासह भर पावसात पथ संचलन करतांना संघाचे कार्यकर्ते दिसून आले. जवळपास तासभर झालेल्या वादळी पावसाने नंदुरबार शहरातील रस्त्यांवर सखल भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरु असल्याचे दिसून आले.
शहरातील मंगळ बाजार, नगरपालिका चौक भागात तर गुडघाभर पाणी साचले. या गुडघाभर पाण्यातूनही वाट काढत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आपले पथसंचलन कायम ठेवले . यावेळी नगरपालिका चौकात भरपावसात नागरिकांकडून या पथ संचलनावर फुलांचा वर्षाव करुन स्वागत करण्यात आले. पावसात अनेकांची तारांबळ उडाली असतांनाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी सुरु ठेवलेल्या या पथ संचलनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीची प्रचितीच सर्वांना आली. कितीही संकटे आली तरी ठाण मांडून उभे राहण्याचा संघ कार्यकर्त्यांचा निर्धार सर्वांना अचंबित करुन गेला. भरपावसातल्या या संचलनाने सर्वांचे ध्यान आपल्याकडे कार्यकर्त्यांनी खेचल्याचे दिसून आले. पुढे तास दीड तासांनंतर शहरातील श्रॉफ हायस्कूल येथे पथ संचलनाचा समारोप झाला. परंतु, त्यानंतरही शहरात या संचलनाची चर्चा सुरु होती.