नंदुरबार – वादग्रस्त विधानांसाठी प्रसिध्द असलेले राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ क्रीडा मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री माणिक कोकाटे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक अनुशंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांना लक्ष्य केले. निवडणूका यांद्यामध्ये घोळ असेल तर विरोधकांचे कार्यकर्ते काय झोपा काढता का, असा प्रश्न केला.
मतदार यांद्यामध्ये घोळ असल्याचे आरोप राजकीय हेतूने प्रेरीत असून निवडणूका जिंकणे शक्य नसल्याने बहिष्कार, निवडणूका पुढे ढकला, असा आग्रह अयोग्य असून या निवडणूका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने होत असल्याने त्या सरकारला मागे घेण शक्य नसल्याचे मंत्री कोकाटे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी अजितदादांनी आदेश दिला आहे. तीन जिल्ह्यांचा संपर्क मंत्री आहे. उमेदवारांची मते जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. नंदुरबारमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद असून जिल्हा परिषदेच्या एकाच गटासाठी दोन ते तीन उमेदवार इच्छुक असल्याचे मंत्री कोकाटे म्हणाले. जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची ताकद राष्ट्रवादीत आहे. परंतु, राज्यात महायुतीच्या पातळीवर चर्चा बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही ४२ आमदारांनी अजितदादांना बिनशर्त पाठींबा दिला आहे. तीन ते चार आमदार वगळल्यास ५० आमदार दादांच्या विचारांचे आहेत. काही लोक नाईलाजास्तव शरद पवार यांच्याकडे गेले आहेत. अजितदादांचा अनुभव, कर्तृत्व, त्यांची प्रश्न सोडविण्यावर असलेली पकड यांची सामान्य जनता आणि आमदारांना कल्पना आहे. मतदारसंघात विकास करायचा असेल तर दादांशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही दादांबरोबर गेल्याचे मंत्री कोकाटे म्हणाले.
शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या पॅकेजवरुन बच्चू कडू करत असलेली सरकारवरील टिका म्हणजे बच्चू कडूंचा बालीशपणा आहे. सरकार जर शेतकऱ्यांबरोबर नसते तर ३७ हजार कोटींची मदत जाहीर केली नसती. राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या अपेक्षा खुप वाढल्या आहेत. मात्र सरकार म्हणून पूरग्रस्तांसाठी जे काही देवेंद्र फडणवीस सरकारला करता येईल ते चांगले करण्याचा प्रयत्न केला आहे. कडू हे विरोधी पक्षात आहेत. निवडून आलेले नाही. त्यामुळे निराशेतून वेडेवाकडे विधान करत असल्याचा टोला कोकाटेंनी हाणला.
कुठल्याही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यांनतर मतदार यादीवर हरकत घेण्याची मुदत असते. बुथस्तरीय कार्यकर्ते मतदार यांदीतील चुका तातडीने शोधून त्यांची दुरुस्ती करुन घेत असतात. आमचे कार्यकर्ते सजग असल्याने मतदार यादी मधला घोळ त्यांनी शोधून काढला. आणि वेळीच मार्गी लावला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधक जागे झाले आहेत .या अगोदर विरोधकांना मतदार यादीत घोळ का जाणवला नाही, असा टोला लगावत विरोधकांकडे बुथवरचे कार्यकर्तेच राहिले नसल्याने राजकीय प्रेरीत आरोप केले जात असल्याचे मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले