नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नियोजनावर भर देण्यात येत आहे. मनुष्यबळाचा विषय आहेच, पण यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने मात करुन पोलिसांना तंत्रस्नेही करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांनी येथे दिली.

गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर येथील पोलीस अधिकाऱ्यांची कायदा व सुवव्यस्थेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीतील माहिती गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक नाशिक-त्र्यंबकेश्वर नगरीत येणार आहेत. गर्दीमुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना होऊ नये यासाठी स्वयंसेवकांबरोबर पोलीस काम करणार आहेत. वेगवेगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात गुन्ह्यांची संख्या वाढत असली तरी गुन्ह्यांची उकलही होत आहे. प्रकरणे प्रलंबित राहत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. जिल्ह्यात सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रबोधन करण्यात येणार असल्याचेही गुप्ता यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विभागीय आढावा बैठकीनंतर गुप्ता यांनी नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील व्यापारी संघटना, उद्योजक यांच्याशी चर्चा केली. उद्योजकांनी शहराची हद्दवाढ करा, सायबर प्रकरणात होणाऱ्या फसवणुकीकडे लक्ष द्यावे, मागण्या करण्यात आल्या. वेगवेगळ्या संघटनांकडून उद्योजकांवर कामगार प्रश्नांविषयी दबाव आणला जात असल्याचेही त्यांनी मांडले.