नाशिक – अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची झालेली विदारक अवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, प्रमुख मार्गांवर होणारी वाहतूक कोंडी आदी समस्यांचे दुष्परिणाम आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमोर मांडले. खुद्द आयुक्त खत्री यांनी पाहणी केली. नंतर आयमा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
पावसाळा संपल्यानंतर लगेचच अंबड औद्योगिक वसाहतीतील खड्डे बुजवले जातील. आणि रस्ता काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन त्यांनी उद्योजकांना दिले.
अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्ते तसेच सर्व सेक्टरमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पथदिपांची संख्याही पुरेशी नाही. जे आहेत ते बंदच असतात. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांचे रुंदीकरण झाले नसल्याने अनेक चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होते. ही स्थिती औद्योगिकरणाच्या विस्ताराला खीळ बसण्यास कारक ठरते. परदेशातील गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास नाके मुरडतात, याकडे आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी लक्ष वेधले. या संदर्भातील निवेदन त्यांनी आयुक्त खत्री यांना सादर केले.
महानगरपालिकेला औद्योगिक वसाहतीतूनच सर्वाधिक महसूल मिळतो. त्यामुळे उद्योजकांना प्राधान्याने मूलभूत गरजा पुरवण्याची गरज आहे. मनपाच्या अंदाजपत्रकात त्यासाठी स्वतंत्र तरतूद करावी अशी आग्रही मागणीही बूब यांनी केली. आयमाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर गोपाळे, सरचिटणीस प्रमोद वाघ, रवी शामदासांनी, जगदीश पाटील, रवींद्र झोपे यांनीही चर्चेत भाग घेतला.
औद्योगिक वसाहत परिसरातील विविध समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली. यावेळी योगेश पाटील, अभिषेक व्यास, हेमंत खोंड, शरद दातीर, अविनाश मराठे, नागेश पिंगळे, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, रवी गुरुनानी यांनीही सहभाग घेत विविध समस्या मांडल्या.
मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण पावसाळा संपल्यानंतर लगेच खड्डे बुजवले जातील तसेच मुख्य रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणाचे कामही हाती घेतले जाईल. गरवारे ते एक्स्लो पॉईंट तसेच पपया नर्सरी व अंबड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण प्रथम टप्यात करण्यात येईल, असे आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले. भूमिगत गटार योजनेचे कामही लवकरच हाती घेतले जाणार आहे. पथ दिपांची दुरुस्ती, अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. फ्रेशअप बेकरीजवळून के सेक्टरमधून औद्योगिक वसाहतीत येणारा रस्ता देखील कॉक्रिटचा केला जाईल. विविध योजनेतून येणारा निधी या कामांसाठी वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.