नाशिक : नव्या सुधारित आकृतीबंधात रद्द झालेली वर्ग चारची पदे पुन्हा निर्माण करावीत, वर्ग तीन आणि वर्ग चारच्या सर्व कार्यरत रोजंदारी कर्मचाऱ्यांचे जोपर्यंत विनाअट समायोजन होत नाही. तोपर्यंत मागील सत्रात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना रोजंदारी पध्दतीनेच आदेश देण्यात यावेत, यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेला बिऱ्हाड मोर्चा सोमवारी नाशिकच्या वेशीवर धडकला. मोर्चेकऱ्यांची आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील वर्ग तीन आणि वर्ग चार रोजंदारी कर्मचाऱ्यांच्याविरोधी असलेले २१ मे रोजीचे बाह्यस्त्रोतद्वारे शिक्षक भरण्याची ई निविदा प्रक्रियेविषयीचे पत्र रद्द करावे तसेच इतर मागण्या बैठकीत मान्य न झाल्याने संघटनेच्या वतीने बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला आहे. चार दिवसांपासून हे मोर्चेकरी चांदवड परिसरातील सोग्रस फाटा येथून आदिवासी आयुक्तालयाच्या दिशेने पायी येत आहेत. सोमवारी हा मोर्चा आडगाव ट्रक टर्मिनलपर्यंत आला. मोर्चेकऱ्यांमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ट्रक टर्मिनल परिसरात आंदोलनकर्त्यांनी ठिय्या देत रास्ता रोको केल्याने कोंडीत भर पडली.
मोर्चेकऱ्यांची घोषणाबाजी, पाऊस यामुळे गोंधळ निर्माण झाला. मोर्चेकऱ्यांबरोबर त्यांच्या कुटूंबातील सदस्य होते. मोर्चेकऱ्यांनी २१ मे २०२५ चा आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतीत शिक्षकांची १७९१ पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा., कार्यरत रोजंदारी कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून विनाअट शासनसेवेत समायोजन करावे, आदी मागण्या केल्या.
दरम्यान, आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी आंदोलकांची भेट घेतली. डाॅ. उईके यांच्या आवाहनानंतरही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. सनदशीर मार्गाने आमचे आंदोलन सुरू राहील. कोणाला त्रास व्हावा, ही आमची इच्छा नाही. वाहतुकीसाठी आम्ही मार्ग खुला करू, असेही आंदोलकांनी सांगितले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही भ्रमणध्वनीद्वारे आंदोलकांशी चर्चा केली. सायंकाळी उशीरापर्यंत मोर्चेकऱ्यांचा ठिय्या हा ट्रक टर्मिनलच्या आवारात होता. पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.