Nashik Crime Update: देशभरातील भाविकांसाठी पवित्र अशा कुंभनगरी नाशिकला झालंय तरी काय, असा प्रश्न आठवड्यापूर्वी विचारणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. सातपूर येथील एका हाॅटेलमधील गोळीबाराचे निमित्त झाले. आणि शहर पोलिसांनी राजकीय पाठबळावर गुंडगिरी करणाऱ्यांची गठडी वळण्यास सुरुवात केली. आम्हीच सरकार…बाॅस…नाना…भाई…सूत्रे इथून हलतात, अशी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्यांना शहर पोलिसांनी गुरुवारी चक्क पोपटासारखे सरळ केले. आणि हे राजकीय पाठबळ असलेले हे गुंड बोलू लागले, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला…नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला…

कोणीही उठतो, हातात कोयता, चाकू, कोयता घेतो. रस्त्यात, चौकात साथीदारांसह एखाद्याची मुद्दामहून कळ काढली जाते. पैशांची मागणी केली जाते. विरोध झाल्यास हल्ला केला जातो. एखाद्या दुकानात शिरुन हप्ता मागितला जातो. प्रतिकार केल्यास भोसकले जाते. अबड, सातपूर या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना अडवून लुटमार केली जाते. जोडीला टोळ्यांमधील आपआपसातील वादातून हाणामाऱ्या यामुळे नाशिककर वैतागले होते.. महाराष्ट्राचे गृह खाते असलेल्या मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपचे नाशिक शहरात तीन आमदार असतानाही शहरात गुन्हेगारी बोकाळल्याने पोलिसांना दोष देणाऱ्या नाशिककरांच्या मदतीला पोलीसच आले आहेत.

सातपूर येथील एका हाॅटेलमधील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी याआधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हा पदाधिकारी आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा पुत्र भूषण लोंढे यासह त्याच्या टोळीतील काही जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची मूळे अधिक खोलवर गेल्याने पोलिसांनी थेट रिपाइंचा ज्येष्ठ नगरसेवक म्हणून वावरणाऱ्या प्रकाश लोंढे यांनाच उचलले.

तसेच त्याच्या दीपक लोंढे या मुलालाही ताब्यात घेतले. लोंढे पिता-पुत्रांची टोळी सातपूर, अंबड परिसरात पी. एल. गँग म्हणून ओळखली जाते. हा परिसर औद्योगिक कंपन्यांचा आहे. रात्री कामावर जाणाऱ्या तसेच कामावरुन परतणाऱ्यांना गाठून, त्यांना धमकावत पैसे हिसकावून घेण्याचा उद्योग या टोळीतील गुंड करीत असल्याची अनेकांची तक्रार आहे. याशिवाय अपहरण, हत्येची धमकी असे प्रकारही या टोळीकडून झाले आहेत.

हाॅटेलमधील गोळीबार प्रकरणी गुरुवारी पोलिसांनी अटक केलेल्या प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे यांना नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेतले. लोंंढे पिता-पुत्र यांची ही चित्रफित समाज माध्यमात फिरु लागल्यावर सर्वांनी नाशिक पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे.