नाशिक – गुन्हेगारांच्या तोंडून नाशिक जिल्हा – कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेतले जात असतांना आता वाहतूक पोलीसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहकार्याने शहरात शनिवारपासून ऑटो रिक्षा शिस्त मोहीम हाती घेतली. चार दिवसांपासून नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या सर्व हद्दीत ही कारवाई सुरू आहे. आतापर्यंत २२५ रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात एका रिक्षा चालकाने गर्दीच्या ठिकाणी महिलेला मारहाण केली होती. त्याच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने रिक्षा चालकांची मुजोरी पुन्हा एकदा उघड झाली. या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने उपआयुक्त किरिथिका यांनी शहरातील मध्यवर्ती भाग आणि बाजारपेठ परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांविरुध्द मोहीम सुरू केली.

बेशिस्त रिक्षाचालकांना नियमांचे पाठ शिकवण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने ऑटोरिक्षा शिस्त मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये रिक्षा चालकाचे नाव, परवाना धारकाचे नाव, परवाना क्रमांक, बॅच, चालकाचा परवाना क्रमांक रिक्षाच्या आतील बाजूने प्रवाशांना दिसेल, अशा ठिकाणी रिक्षात लावणे बंधनकारक करण्यात आले.

रिक्षा चालकांनी गणवेशात राहावे, तसेच दिलेला बिल्ला लावावा. परवाना संपलेल्या व तांत्रिकदृष्टया अयोग्य किंवा धोकादायक रिक्षा चालवताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. धोकादायक पध्दतीने रिक्षा चालविणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे.

वाहतुक विभागाच्या वतीने शहरातील गंगापूर रोड, कॉलेज रोड, मुंबई नाका, त्र्यंबक नाका, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, शालिमार, सीबीएस सिग्नल, सिटी सेंटर मॉल, आनंदवल्ली, सारडा सर्कल, राजदूत हाॅटेल, कॅनडा कॉर्नर आणि बाजारपेठ परिसरासह अन्य ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांबरोबर वाहतूक नियंत्रण व तपासणी पथके नियुक्त करत कारवाई सुरू आहे.

काही ठिकाणी रिक्षाचालकांशी वाद झाले. दरम्यान, तपासणीवेळी काही कागदपत्रे जमा करण्यात आली. काही वाहने मुदतबाह्य असल्याने ती जप्त करण्यात आली. ही कारवाई यापुढेही सुरु राहणार असल्याचा इशारा वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आला.

शहर वाहतुक विभागाच्या वतीने पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १४ पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाई सुरू आहे. कारवाईत प्रामुख्याने रिक्षाचालकाचा गणवेश, त्याच्याकडील कागदपत्रे तसेच वाहने मुदतबाह्य असल्यास कारवाई होत आहे. चार दिवसात २२५ हून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही वाहने जमा करण्यात आली आहेत. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून रिक्षाचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे. – किरथिका सी. एम. (पोलीस उपआयुक्त, वाहतूक विभाग).