जळगाव : जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या जळगाव ते नंदुरबार मार्गावरील अमळनेर स्थानकाजवळ गुरूवारी दुपारी कोळसा वाहून नेणारी मालगाडी अचानक रूळावरून घसरली. अपघातामुळे भुसावळ, जळगावहून सुरतकडे चालणारी सर्व प्रकारची रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून, ती सुरळीत करण्यासाठी पश्चिम रेल्वेचे प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

कोळसा वाहून नेणारी मालगाडी अमळनेर स्थानकावरून दुपारी दोनच्या सुमारास नंदुरबारकडे मार्गस्थ झाली होती. स्थानकापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावरील प्रताप महाविद्यालयाजवळ पोहोचताच काही कळण्याच्या आत मालगाडीचे डबे दुसऱ्या क्रमांकाच्या इंजिनसह रूळावरून खाली घसरले. अपघात घडला त्यावेळी रेल्वे गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, धावत्या रेल्वेचे डबे रूळावरून घसरल्याने आजूबाजुच्या रुळांचे नुकसान झाले. याशिवाय कोळसा भरलेल्या मालगाडीच्या काही डब्यांचे मधोमध दोन तुकडे पडले. डब्यांमध्ये असलेला दगडी कोळसाही इतरत्र विखुरला गेला. ज्यामुळे रेल्वे प्रशासनाची मोठी आर्थिक हानी झाली आहे.

पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने जळगाव ते सुरत मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी व मालगाड्या जागच्या जागी थांबल्या. लांबच्या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांना परिणामी खूप हाल सहन करावे लागले आहेत. अमळनेर स्थानकापासून काही अंतरावरच प्रताप महाविद्यालयाच्या शेजारी अपघाताची घटना घडल्याने अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीच्या कामाला सुरूवात केली आहे. अपघात कसा घडला, मालगाडीचे डबे रूळावरून घसरण्यामागे कोणती कारणे आहेत, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. स्थानिक पोलीस प्रशासन आणि रेल्वे कर्मचारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.