नाशिक – प्रशासनाने मागण्या मान्य कराव्यात, या हट्टाला पेटलेल्या महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन, वर्ग चार कर्मचारी संघटनेने आदिवासी विकास भवनासमोर दिलेला ठिय्या सातव्या दिवशी कायम राहिला. आंदोलकांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने आदिवासी विकास भवनाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दुसरीकडे, आंदोलकांनी आता मागण्या मान्य होईपर्यंत अन्नत्याग करण्याचा इशारा दिला आहे.
मागण्या मान्य होत नसल्याने मंगळवारी आंदोलकांनी भारूड सादर करुन प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यानंतर आंदोलकांनी एकत्र येत आदिवासी आयुक्त कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलीस बळापुढे त्यांचा हा प्रयत्न असफल ठरला. त्यामुळे आंदोलकांनी त्याच ठिकाणी ठिय्या देत घोषणाबाजी सुरू केली.
पाऊस आणि उघड्यावरील मुक्कामामुळे आतापर्यंत सहा आंदोलकांना रक्तदाब कमी-जास्त होण्यासह अन्य काही तक्रारींना तोंड द्यावे लागले. काही जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांच्यापैकी काही जणांना सोडण्यात आले. मंगळवारी आंदोलकांना त्रास झाल्यानंतर महानगरपालिकेची रुग्णवाहिका आंदोलनस्थळी आली. परंतु, रुग्णवाहिकेत कचरा होता. रुग्णांना ने-आण करण्यासाठी स्ट्रेचर नव्हते. रक्तदाब तपासण्यासाठी आणलेले यंत्र बंद होते, अशा वेगवेगळ्या तक्रारी आंदोलकांकडून करण्यात आल्या. प्रशासनाकडून दाखविण्यात येत असलेल्या अनास्थेमुळे आंदोलकांनी उपचार घेण्यास नकार दिला.
काही संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याकडून आंदोलकांना आतापर्यंत जेवण देण्यात येत होते. आंदोलकांनी आणलेला काही शिधाही होता. परंतु, आंदोलन सातव्या दिवशीही कायम राहिल्याने मदतीचा ओघ कमी झाला. आंदोलकांनी मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आंदोलकांनी सोमवारी रात्रीचे जेवण घेतले. मंगळवारी ते दुपारपर्यंत उपाशी होते. आंदोलकांपैकी काही जणांनी अन्नत्याग केले आहे.
दरम्यान, आंदोलन काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिक शहर पोलिसांच्या वतीने शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साधारणत: हजार पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या सत्रात कार्यरत आहेत.