नाशिक : सलग दोन दिवस झालेल्या पावसाचा जोर ओसरला असला तरी जिल्ह्यातील १६ धरणांमधून शुक्रवारीही विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील २० धरणे तुडूंब आहेत. या धरणांमध्ये पावसाचे येणारे पाणी साठविण्यासाठी फारशी जागा शिल्लक नाही. त्यामुळे पाणी सोडणे क्रमप्राप्त ठरते. या स्थितीमुळे यंदा नाशिकमधून तब्बल ४८ हजार ७५० दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे ४९ टीएमसी पूरपाणी जायकवाडीकडे प्रवाहीत झाले आहे.

दोन दिवसांच्या तुलनेत धरणांतील विसर्ग कमी झाल्यामुळे गोदावरीसह दारणा नदीच्या पाणी पातळीत काहिशी घट झाली झाली. शुक्रवारी सकाळी दारणा धरणातून ६०२४, क्युसेक, गंगापूर ५२०, मुकणे ३६३, वालदेवी ८१४, आळंदी ४४६, भावली ९४८, भाम २९९०, वाघाड १४२९, तिसगाव ७१, करंजवण १३८६, वाकी ६१६, कडवा २३४०, पालखेड ३१९२, पुणेगाव ३००, ओझरखेड ९४ आणि नांदूरमध्यमेश्वरमधून ४५ हजार ७६६ क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. धरण परिचालन सूचीनुसार पावसाळ्यात कोणत्या महिन्यात, किती जलसाठा असावा, हे निश्चित असते. त्यानुसार अतिरिक्त पाणी सोडावे लागते. दरवर्षी ही प्रक्रिया हंगामाच्या अखेरीस घडते. तेव्हा धरणे भरण्याच्या स्थितीत असतात. यंदा मात्र ही प्रक्रिया सुरुवातीला झाली. प्रारंभीच्या दीड महिन्यात मुसळधार पाऊस झाला. बहुतांश धरणांमध्ये तेव्हाच समाधकारक जलसाठा झाला असल्याने आता पाऊस झाला की, विसर्ग करावा लागतो, अशी स्थिती आहे.

जिल्ह्यातील लहानमोठ्या २६ धरणांमध्ये सध्या ६१ हजार ९४१ दशलक्ष घनफूट म्हणजे ८८ टक्के जलसाठा आहे. कश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी, वाघाड, तिसगाव, भावली, वालदेवी, भाम, हरणबारी, नागासाक्या, व माणिकपूंज ही ११ धरणे तुडूंब झाली आहेत. तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर, करंजवण, ओझरखेड, दारणा, मुकणे, नांदूरमध्यमेश्वर, वाकी, केळझर ही ९० टक्क्यांहून अधिक जलसाठा असणारी आठ धरणेही तांत्रिकदृष्ट्या भरलेली आहेत.

गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समुहातील धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रातून पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे जाते. एक जून ते २२ ऑगस्टपर्यंत या बंधाऱ्यातून ४८ हजार ७५० दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे ४९ टीएमसी पाणी जायकवाडीकडे प्रवाहित झाले. यंदा विक्रमी वेळेत जायकवाडी धरणही जवळपास तुडूंब झाले आहे. या धरणाचा धरणसाठा जुलैमध्येच ६५ टक्क्यांहून अधिकवर गेल्याने समन्यायी पाणी वाटपाचा विषयही आधीच संपुष्टात आला होता. पावसाचा हंगाम आणखी सव्वा महिना आहे. त्यामुळे पुढील काळात नाशिकमधून आणखी पूरपाणी प्रवाहित होणार आहे.