नाशिक – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक प्रकल्पात तयार झालेले पहिले ‘तेजस एमके-१ ए’ हे लढाऊ विमान आकाशात भरारी घेणार आहे. या लढाऊ विमानांचे उत्पादन पावणेदोन वर्ष रखडल्याने हवाई दल चिंतीत होता. अखेर त्यास महुर्त लाभला. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे नाशिकमध्ये येत आहेत. शुक्रवारी सकाळी प्रथम ते त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पूजाविधी करतील. नंतर त्यांच्या उपस्थितीत ओझरस्थित एचएएल प्रकल्पात विविध कार्यक्रम होणार आहेत.

भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांचा असमतोल दूर करण्यासाठी एचएएलने नाशिक प्रकल्पात तेजस एमके – १ ए लढाऊ विमानाची तिसरी उत्पादन साखळी कार्यान्वित केली आहे. याआधीच्या दोन साखळ्या बंगळुरू येथे असून वार्षिक उत्पादन क्षमता विस्तारत शक्य तितक्या लवकर, नियोजित वेळापत्रकानुसार विमाने वितरीत करण्याचा प्रयत्न आहे. तेजसमध्ये ७५ टक्के सामग्री स्वदेशी असली तरी इंजिनसाठीचे परावलंबित्व उत्पादन रखडण्याचे मुख्य कारण ठरले. तेजस – एमके – १ एच्या पूर्ततेस फेब्रुवारी २०२४ पासून सुरुवात होणे अपेक्षित होते.

इंजिनसाठी एचएएलने अमेरिकेतील जीई एरोस्पेसशी करार केलेला आहे. या कंपनीमार्फत २०२३-२४ वर्षात १६ इंजिन दिले जाणार होते. मात्र ते वेळेत न मिळाल्याने तेजसच्या उत्पादनात अडथळा निर्माण झाला. यामुळे एचएएलची कोंडी झाली असताना दुसरीकडे हवाई दलाच्या लढाऊ क्षमतेवर परिणाम होण्याची स्थिती निर्माण झाली. विलंबावरून हवाई दल प्रमुख .. यांनी रोष प्रगट केला होता. आता डिसेंबर अखेरपर्यंत एचएएल तेजस एमके – १ ए ची पहिली तुकडी देणार आहे.

प्रारंभीच्या मागणीनुसार एचएएलला ८३ तेजस –एमके- १ ए विमाने हवाई दलास द्यायची आहेत. आणखी ९७ एमके-१ए खरेदी केली जाणार आहेत. या स्थितीत तेजसच्या उत्पादनातील अडथळे दूर होऊन आणखी एक उत्पादन साखळी कार्यान्वित होणे केवळ हवाई दलच नव्हे तर, देशासाठी महत्वाचे ठरते. तेजस – एमके- १ एचा मार्ग सुकर होत असल्याने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी सायंकाळी ते ओझर विमानतळावर दाखल होतील.

सायंकाळी त्यांच्या हस्ते ओझर येथे मिनी स्मार्ट टाऊनशिपचे उद्घाटन होणार आहे. शुक्रवारी सकाळी ते त्र्यंबकेश्वर येथे जातील. त्र्यंबक राजाचे दर्शन आणि पूजा-विधी करून ते पुन्हा एचएएलमधील मुख्य कार्यक्रमास येतील. साडेअकरा वाजता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते तेजस –एमके- १ एच्या तिसऱ्या उत्पादन साखळीचे उद्घाटन होईल. तसेच एचएएल प्रकल्पात कार्यान्वित करण्यात आलेल्या एचटीटी-४० या प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचे उद्घाटन होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.