नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारी झालेला दिल्ली दौरा नाशिक आणि धुळे या दोन जिल्ह्यांसाठी एक आनंदवार्ता घेऊन आला. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी केंद्राकडून निधी मिळावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत इतरही काही प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ठेवले. त्यापैकी एक नाशिक आणि धुळे जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळू शकणार आहे.

महाराष्ट्रात सप्टेंबर महिना अतिवृष्टीचा जात आहे. प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा या भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि मालमत्तेचे अधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. मराठवाड्यातील बहुतेक शेतांमध्ये अजूनही पाणी आहे. पिके आडवी झाली आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रु आहेत. होत्याचे नव्हते झाले. अशा प्ररिस्थितीत केंद्राकडून राज्य सरकारला मदत करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात नाशिक-धुळे,अहिल्यानगर-संभाजीनगर आणि नागपूर-वर्धा-अमरावती-सावनेर असे तीन संरक्षण काॅरिडाॅर (मार्गिका) विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यासंदर्भातील सादरीकरणही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. संरक्षण कॉरिडॉर म्हणजे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राद्वारे संरक्षण उपकरणांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी एक मार्ग किंवा जाळे आहे. ज्यामुळे संरक्षण दलांची क्षमता वाढते. आणि देशाच्या संरक्षण क्षेत्राला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. संरक्षण काॅरिडाॅर प्रस्तावास पंतप्रधानांकडून मंजुरी मिळाल्यास नाशिक आणि धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी ते एक महत्वपूर्ण पाऊल असेल. महाराष्ट्रात लष्कराचे दहा दारुगोळा निर्मिती कारखाने आहेत. नाशिक-धुळे काॅरिडाॅरला मान्यता मिळाल्यास मोठी गुंतवणूक होऊन रोजगार निर्माण होईल. नाशिक आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यातील युवकांना त्यामुळे रोजगाराची संधी मिळेल. राज्य शासनाने यासंदर्भात काही सामंजस्य करार याआधीच केले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांकडून नाशिक-धुळे काॅरिडाॅरला लवकरच मान्यता मिळेल, अशी सर्वांना आशा आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर असलेले नाशिक आणि धुळे हे दोन्ही जिल्हे आहेत. उत्तर महाराष्ट्रातील या दोन महत्वाच्या जिल्ह्यांना जोडणारी संरक्षण काॅरिडाॅर दोन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी कारणीभूत ठरेल. नाशिक जिल्ह्यात याआधीच हिंदुस्थान एरोनाॅटिक्स लिमिटेड (एचएएल) हा संरक्षण क्षेत्रातील प्रकल्प कार्यान्वित आहे. धुळे जिल्ह्यात मात्र तसा कोणताही प्रकल्प नाही. नाशिकच्या तुलनेत काहीशा अविकसित असलेल्या धुळे जिल्ह्यासाठी संरक्षणविषयक काॅरिडाॅर वरदान ठरु शकेल.