नाशिक – शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीने दरवर्षाप्रमाणे आपले वेगळेपण जपले. सुमारे १२ तास विसर्जन मिरवणूक चालली. मध्यरात्री १२ नंतर मिरवणुकीचा समारोप झाला. शनिवारी सकाळपासून सुरु झालेल्या संततधार पावसात नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशीराने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

मिरवणुकीतील क्रमांक चिठ्ठी पध्दतीने ठरविण्याच्या मागणीसाठी अडून बसलेल्या सहा मंडळांनी विसर्जन मिरवणूकीच्या एक दिवस आधी माघार घेतल्याने मिरवणुकीत २५ मंडळांनी सहभाग घेतला. पोलिसांची सूचना धुडकावून लावत काही मंडळांकडून आवाजाच्या भिंतींचा मिरवणुकीत वापर करण्यात आला. भर पावसात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

जुन्या नाशिकमधील वाकडी बारव येथून परंपरेनुसार मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष समीर शेटे, माजी आमदार वसंत गिते, शिवसेवा मंडळाचे प्रमुख विनायक पांडे, संजय चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणुकीत अग्रस्थानी महापालिकेचा मानाचा गणपती होता. मंत्री महाजन यांनी यांनी मिरवणूक सुरू झाल्यावर ढोल वादनाचा आनंद घेतला. आमदार देवयानी फरांदे यांनी टाळ वाजवत साथ दिली.

नाशिकच्या विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असलेल्या गुलालवाडी व्यायामशाळेतील लेझीम पथकातील सदस्यांची संख्या यावेळी अंतर्गत वादामुळे कमी झाल्याचे दिसले. रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचा चांदीचा गणेश रथात स्थानापन्न झाला होता. शिवसेवा मंडळाच्या भव्य मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ढोल पथकांचा निनाद आणि त्यात घोषणांची पडणारी भर यांनी मिरवणुकीचा दिमाख वाढवला.

शिवसेवा युवक मित्र मंडळाच्या वतीने शिवलिला, कालीमाता अशा वेगवेगळ्या देवदैवतांची स्तुती करणारे नृत्य सादर करण्यात आले. अग्नीचा वापर यावेळी करण्यात आला. काही मंडळांनी पारंपरिक युध्दकलांचे प्रात्यक्षिक सादर केले. गुलालवाडी व्यायामशाळेने नेहमीप्रमाणे लेझीमवर ताल धरला. याशिवाय ढोल पथकांनी वेगवेगळे वादनाचे प्रकार सादर केले. पावसामुळे ढोलचा आवाज कमी झाला होता. काही मंडळांनी पोलिसांनी सूचना दिलेली असतानाही एकाऐवजी दोन ढोल पथकांचा समावेश केल्याचे दिसून आले.

मिरवणुकीचा समारोप मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करण्याचे प्रशासनाचे नियोजन होते. परंतु, रात्री १२ नंतर पारंपारिक वाद्यासह मिरवणुकीस परवानगी दिल्याने रात्री दीडच्या पुढेही मिरवणूक सुरू राहिली. मिरवणूक साधारणत: १२ तासांहून अधिक काळ चालली. रविवार कारंजापर्यंत संबंधित पथकाचे मंडळ आल्यावर अनेक ढोल पथकांनी थांबून घेणे पसंत केले.

दुसरीकडे, सकाळी १० वाजेपासून घरोघरच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनास सुरुवात झाली. पाऊस असला तरी भक्तांमध्ये प्रचंड उत्साह होता., मिरवणूक मार्गावर ८० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन या माध्यमातून देखरेख ठेवण्यात आली. मिरवणुकीत महिला व तरूणाईचा सहभाग अधिक राहिला. मिरवणूक शांततेत पार पडल्याने पोलिसांसह प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. पोलीस बंदोबस्त आणि कार्यकर्ते, स्वयंसेवक यांची तत्परता यामुळे मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

आवाजाच्या भिंतींचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाई

नाशिक विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी काही बंधने घातली होती. यामध्ये आवाजाच्या भिंतींचा वापर न करण्यासंदर्भात सूचना करण्यात आली होती. तरीही मुंबई नाका येथील शिवमुद्रा मित्र मंडळ, युवक मित्र मंडळ, दंडे हनुमान, रोकडोबा मित्र मंडळ तसेच युनायटेड मित्र मंडळांनी आवाजाच्या भिंतींचा वापर केला. या मंडळांविरुध्द गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संबंधित मंडळे राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. – संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त)