नाशिक – आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २२०० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांसाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीनंतर महाजन यांनी वेगवेगळ्या विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. महाजन यांनी शहर परिसरात अनेक ठिकाणी पाहणीही केली. कुंभमेळ्याच्या दृष्टीने रिंगराेड लवकर तयार होईल. शहरातील वाहतूक प्रश्न गुंतागुंतीचा आहे. द्वारका भागात पाहणी केली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणबरोबर २२ जून रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गडकरी चर्चा करणार असल्याचे महाजन यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात महामेट्रोचे काम रखडल्याची आपणास कल्पना नाही. मुख्यमंत्री पालकमंत्री म्हणून काम पाहत असल्याने ते ठरवतील, असे महाजन यांनी सांगितले. गुरूवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहर तसेच जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. सध्याच्या काळात आपल्याकडे कमी वेळात जास्त पाऊस पडत असल्याने अशी परिस्थिती उदभवत असल्याचे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्यासाठी नवीन घाट बांधले जात आहेत. गोदावरी प्रदूषणमुक्त राहण्यासाठी १२ महिने प्रवाहित राहावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. साधुग्राम किंवा अन्य कामासाठी भूसंपादनावर लवकरच उपाय शोधण्यात येणार आहे. ४०० एकर भूसंपादन करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी नमूद केले.