नाशिक : भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यातील संघर्षामुळे रखडलेल्या नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या वादाला स्वातंत्र्य दिनी गिरीश महाजन यांना ध्वजारोहणाची संधी मिळाल्याने वेगळी कलाटणी मिळाली. राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत जळगाव जिल्हा व आपल्या मतदारसंघाला विसरू नका, याकडे लक्ष वेधत महाजनांचे कान टोचले. पालकमंत्रीपदाच्या तिढ्यात कुरघोडीच्या राजकारणाचा नवीन अध्याय सुरू झाला आहे.

महायुती सरकारकडून राज्यातील पालकमंत्रीपदाची घोषणा होऊन बरेच महिने लोटले. परंतु, नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा पेच मात्र काही अद्याप सुटलेला नाही. शिंदे गटाच्या विरोधामुळे गिरीश महाजनांच्या नियुक्तीला यापूर्वीच स्थगिती द्यावी लागली होती. दादा भुसे यांच्यासाठी शिंदे गट आग्रही आहे. नाशिकच्या ध्वजारोहणासाठी मंत्री महाजन यांची नियुक्ती झाल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. कारण याच वेळी छगन भुजबळांनी गोंदियाला ध्वजारोहणास जाण्यास नकार दिला होता. काय करायचे ते नाशिकमध्येच असे म्हणत त्यांनी काही वर्षांपूर्वी धुळ्याचे पालकमंत्रीपद नाकारल्याचा दाखला दिला. नाशिकचे ध्वजारोहण झाल्यानंतर मंत्री महाजन यांनी ध्वजारोहण झाले, आता हळूहळू पुढे जाऊ असे नमूद केले. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. तो मान्य असेल. यासाठी आपण कधी मागणी व फलकबाजीही केलेली नसल्याचा टोला त्यांनी भुजबळांना उद्देशून लगावला.

छगन भुजबळांनी त्यास आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. नाशिक सगळ्यांना आवडते. कुणीही जरूर पुढे जावे. परंतु, जळगावसह मतदारसंघाला न विसरण्याचा सल्ला त्यांनी महाजनांना दिला. नाशिकमध्ये रा्ष्ट्रवादी व शिंदे गटाचे मिळून चार मंत्री आहेत. असे असताना जळगावच्या मंत्र्याला नाशिकच्या ध्वजारोहणाची संधी दिली गेली. याची अस्वस्थता बाहेर येत आहे.

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार) सात आमदार आहेत. सर्वाधिक आमदार असल्याने पालकमंत्रीपद आपल्या पक्षाकडे हवे हे प्रारंभी ठासून सांगणाऱ्या माणिकराव कोकाटेंचे कथित रमी प्रकरणात मंत्रिपद जातजाता राहिले. कृषिसारखे खाते गमावून त्यांना क्रीडामंत्री व्हावे लागले. त्यांचा आवाज क्षीण झाला. शिंदे गटाचे दोन आमदार असून यातील दादा भुसे हे मंत्री आहेत. गतवेळी त्यांच्याकडे नाशिकचे पालकत्व होते. आगामी कुंभमेळा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्रीपदास महत्व प्राप्त झाले आहे. शिंदे गट दावा सोडण्यास तयार नाही. या स्थितीत मंत्रिमंडळात उशिराने दाखल झालेल्या भुजबळांनीही मोर्चेबांधणी सुरू केल्याचे मानले जाते. गोंदियाला जाणे नाकारून भुजबळांनी महाजनांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. भाजपचे जिल्ह्यात पाच आमदार असतानाही पक्षाने एकाही ज्येष्ठ आमदारास मंत्रीपदाची जबाबदारी दिली नाही. कुंभमेळा नियोजनाची धुरा सांभाळणाऱ्या महाजनांकडे नाशिकचे पालकमंत्रीपद सोपवण्याच्या भाजपच्या प्रयत्नात शिंदे गटाबरोबरच भुजबळांच्या रुपाने राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही नव्याने अडथळा निर्माण झाल्याचे चित्र आहे .