Nashik Godavari River Flood– शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून संततधार सुरु असून नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. नाशिक शहरात ठिकठिकाणी दुचाकी बुडतील इतपत पाणी साचले आहे. ग्रामीण भागात शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके आडवी झाली आहेत. गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरीला पूर आला आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात रविवारीही जोरदार पाऊस होत असल्याने गंगापूर धरणातून दुपारी पुन्हा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीची पाणी पातळी पुन्हा वाढली आहे. पाणलोट क्षेत्रातील पाऊस लक्षात घेता गोदावरीच्या पाणी पातळीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. रविवारीही त्याचा जोर कायम राहिल्याने पाण्याचा सर्व येवा गंगापूर धरणात झाला. गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात त्र्यंबकेश्वरचा समावेश होता. त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांना पाटाचे स्वरुप प्राप्त झाले. धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांची त्यामुळे गैरसोय झाली.

शनिवारी रात्री पावसाचा जोर अधिक वाढला होता. पाऊस रविवारीही कायम राहिला. संगमेश्वर महादेव मंदिर चौक परिसर, कुशावर्त चौक ते भगवती चौक यासह विविध भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरले. त्र्यंबक ते प्रयागतीर्थ रस्ता पाण्याखाली गेला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली, तळवाडे, पिंपळद, वेळूंजे, शिरसगाव, यासह आजूबाजूच्या गावांमध्येही जोरदार पाऊस सुरु होता.

गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या भागात तसेच कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरण पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु राहिल्याने दोन्ही धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी गंगापूर धरणात येत असल्याने गंगापूर धरणातून विसर्ग करणे भाग पडले आहे. गंगापूर धरणातून ६५१३ क्युसेक विसर्ग सुरु होता. त्यात दुपारी एक वाजता २१७१ क्युसेकने वाढ करण्यात आली. त्यामुळे एकूण विसर्ग सद्यस्थितीत ८६८४ क्युसेक झाला आहे. रामकुंडाजवळील अहिल्यादेवी होळकर पूल येथे दुपारी १८४७.५० फुट पाणी पातळी झाली. या ठिकाणाहून १३०४५.७२ क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता.

होळकर पूल येथील पाणी साठ्याची इशारा पातळी १८४७.५० फुट आहे. इशारा विसर्ग १३०४५.७२ क्युसेक आहे. धोका पाणी पातळी १८४९ फुट आणि धोका विसर्ग १९०७९.८७ क्युसेक इतका आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने विसर्ग करण्यात येणार आहे. परिणामी गोदावरीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता तथा नाशिक जिल्हा सहायक पूर समन्वयक सोनल शहाणे यांनी दिला आहे.

दुपारी तीन वाजेनंतर नाशिककर गोदावरीच्या पाणी पातळीचे निदर्शक मानत असलेला दुतोंड्या मारुती पाण्याखाली बुडाला. गोदावरीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता तथा नाशिक जिल्हा सहायक पूर समन्वयक सोनल शहाणे यांनी दिला आहे.