मालेगाव : शिक्षक भरतीच्या शालार्थ ओळख प्रणालीतील घोटाळ्याचे प्रकरण राज्यभर गाजत असताना राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची बेकायदेशीर भरती करण्याचा घाट घालण्यात आल्याचे प्रकरण शिक्षण मंत्र्यांच्या मालेगावातील एका संस्थेत समोर आले आहे. राजकीय दबाव तसेच शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार याला कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप संबंधित शिक्षण संस्थेच्या दोघा विश्वस्तांनी केला.
१९८२ मध्ये स्थापन झालेल्या सर्वांगीण विकास मंडळ या शिक्षण संस्थेतर्फे टेहरे येथे समता विद्यालय ही माध्यमिक शाळा चालविली जाते. संस्थेच्या १३ विश्वस्तांपैकी एकूण नऊ जणांचे निधन झाले आहे. विश्वस्त मंडळाची निवड आणि नवीन विश्वस्तांच्या नियुक्तीसाठी या संस्थेच्या नावाने धर्मदाय उपायुक्तांकडे वेळोवेळी जे बदल अर्ज सादर करण्यात आले होते, ते फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे आजच्या घडीला केवळ चारच विश्वस्त अस्तित्वात असल्याने सभेसाठी गणपूर्ती होत नाही. तसेच सन २००२ पासून संस्थेत नियमानुसार विश्वस्त मंडळ अस्तित्वात येऊ शकले नाही.
राज्य शासनाकडून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करताना एका जागेसाठी दहा उमेदवारांची नावे संबंधित खासगी शिक्षण संस्थांकडे पाठवली जातात. त्या अनुषंगाने संबंधित संस्थांकडून मुलाखती घेऊन उमेदवारांची अंतिम निवड केली जाते. या प्रक्रियेत शिक्षण संस्थांचे विश्वस्त मंडळ हे नियुक्ती प्राधिकरण असल्याने ज्या संस्थांमध्ये वाद आहेत आणि जेथे नियमानुसार विश्वस्त मंडळ अस्तित्वात नाही, अशा संस्थांच्या पवित्र पोर्टलवरील भरतीच्या जाहिरातीला शिक्षण आयुक्तांकडून मान्यता दिली जात नाही. याच कारणावरून पहिल्या टप्प्यातील भरतीत समता विद्यालयाच्या शिक्षक भरतीची जाहिरात नामंजूर करण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यातील भरतीत अशाप्रकारे महाराष्ट्रातील एकूण ८१ संस्थांच्या जाहिराती अमान्य करण्यात आल्या आहेत. मात्र टेहरे येथील संस्थेत शिक्षण आयुक्तांनी भरतीला मान्यता दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या संस्थेत शिक्षकांची सहा पदे भरण्यात येणार असून त्यासाठी ५१ उमेदवारांची नावे पाठवण्यात आली आहेत. संस्थेत नियमानुसार नियुक्ती प्राधिकरण नसताना मुलाखती कोण घेणार, त्यात गैरव्यवहार झाला, उमेदवारांची फसवणूक झाली तर त्याला जबाबदार कोण राहील, असा प्रश्न संस्थेचे विश्वस्त जिभाऊ शेवाळे व दयाराम शेवाळे यांनी उपस्थित केला. शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक असलेले एक विश्वस्त हे संस्थेच्या नावाने बेकायदेशीर कारभार करीत असून ही भरती प्रक्रिया रेटण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप त्यांनी केला.
संस्थांच्या मागणीनुसार आवश्यक ती तपासणी करून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यास मंजूरी देण्याची जबाबदारी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांची असते. टेहरे येथील संस्थेत कायदेशीर विश्वस्त मंडळ अस्तित्वात नाही, या संबंधीची तक्रार आमच्या कार्यालयास पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर प्राप्त झाली. असे असले तरी या प्रकरणी योग्य ती शहानिशा करून नियमानुसारच भरती प्रक्रिया राबवली जाईल. – राजेश शिंदे (उपसंचालक, शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे).