नाशिक : जळगाव, उत्तर महाराष्ट्रात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे १३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जळगावला वादळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. सुमारे ११०८ हेक्टरवरील केळी, गहू, हरभरा, मका पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नाशिकमध्ये १७२ हेक्टरवरील द्राक्षबागा, गहू आणि कांदा रोपांचे नुकसान झाले.

जळगाव जिल्ह्यातील यावल आणि रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे अधिक नुकसान झाले. यावलच्या १८ गावातील १३७५ आणि रावेरच्या तीन गावांमधील ३२ शेतकऱ्यांना फटका बसला. कृषी विभागाच्या पाहणीत यावलमध्ये १०९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यात ५८८.५ हेक्टरवरील हरभरा, ३८२ हेक्टरवरील केळी, ४९.५ हेक्टरवरील मका, ५४ हेक्टरवरील गहू आणि १९ हेक्टरवरील तुरीचा समावेश आहे. रावेर तालुक्यात १५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपरोक्त भागात पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा…साठवलेल्या खतांची जुन्या दरानेच विक्री- कृषिमंत्र्यांची सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात ९६ हेक्टरवरील द्राक्षबागा, ४७ हेक्टरवरील गहू आणि २३ हेक्टरवरील कांदा रोपे असे एकूण १७२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. २३ गावातील ३०१ शेतकरी बाधित झाले. दिंडोरी, येवला आणि नाशिक तालुक्यातील हे नुकसान आहे. या पावसाने साखर उतरलेल्या द्राक्ष मण्यांना (तयार झालेल्या बागा) तडे जाण्याची भीती आहे. काही भागात हंगामपूर्व द्राक्षांची काढणी सुरू आहे. मण्यांमध्ये साखर उतरलेल्या द्राक्षांवर पाण्याचा थेंब पडला तरी तडे जातात. अशा द्राक्षबागांना अवकाळीची झळ बसणार असल्याचे द्राक्ष बागाईतदार संघाचे नाशिक विभागीय मानद सचिव बबनराव भालेराव यांनी सांगितले.