मालेगाव : लोकांमध्ये दहशत निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुन्हेगारांविरोधात नाशिक शहरातील पोलीस दल आक्रमक झाले आहे. पोलिसांनी दाखविलेल्या हिसक्यानंतर ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ अशी भाषा वापरत कायदाच सर्वश्रेष्ट आहे,असे नामचीन गुंड जाहिररित्या मान्य करु लागले आहेत. गुन्हेगारी निर्मूलनाच्या ‘नाशिक पॅटर्न’चा हा कित्ता गिरवण्याचे काम आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही सुरू झाल्याचे दिसत आहे. या अनुषंगाने कळवण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
शेतमजुराचे अपहरण व घातपात झाल्याचा बनाव करत ठाण्यात घुसून पोलिसांना वेठीस धरण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील कळवण मध्ये गेल्या ४ ऑक्टोबर रोजी घडला होता. त्यावेळी आंदोलन करत समाजकंटकांकडून पोलीस तसेच पोलीस वाहनावर दगडफेक झाली होती. या समाजकंटकांची धरपकड सुरू करून त्यांना दणका देण्याचा सपाटा आता पोलिसांनी लावला आहे. कळवण येथील विठोबा पवार हा आदिवासी शेतमजूर बेपत्ता झाल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला होता. नंतर त्याचे अपहरण व घातपात झाल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला होता. त्यासाठी कळवण पोलीस ठाण्यासमोर तब्बल १५ तास आंदोलन केले गेले होते.
या आंदोलनादरम्यान जमावाकडून पोलिसांवर दगडफेक झाली होती. यावेळी संतप्त आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला होता. आंदोलकांच्या दबावामुळे राजेंद्र शिंदे व राहुल शिंदे या शेतकरी पिता-पुत्रावर अपहरण व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. विठोबा हा शिंदे यांच्या शेतावर कामास होता. हे काम सोडून तो दुसरीकडे गेल्याच्या वादातून अपहरण व घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आला होता. यामुळे कळवणमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व तेगबिरसिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक किरण सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक टेंभेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांनी या प्रकरणाच्या तपासाला वेग दिला. त्यासाठी पोलिसांची वेगवेगळे पथके निर्माण केली गेली. या तपासात धक्कादायक माहिती समोर आली.
पोलीस तपासात जो शेतमजूर बेपत्ता झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता, तो त्याच्या घरातच लपून बसल्याचे आढळून आल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान,शेतमजुराच्या नातेवाईकांकडून खोटा बनाव करत शेतकरी पिता-पुत्रास वेठीस धरण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार करत प्रत्युत्तरादाखल गावातील अन्य शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला. तसेच याप्रकरणी पोलिसांना निवेदन देत खोटा गुन्हा रद्द करून दोघा शेतकऱ्यांची तातडीने सुटका करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या विरोधातील कलमे कमी केली असले तरी ते अद्याप तुरुंगातून बाहेर येऊ शकले नाहीत.
दगडफेक करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांविरोधात कळवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ठाण्यात घुसून दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांची ओळख पटवून धरपकड सुरू केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ६७ संशयीत निष्पन्न झाले असून त्यातील १४ संशयितांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. शनिवारी न्यायालयासमोर उभे करण्यासाठी नेत असताना अटक केलेल्या या सर्व संशयीतांची पोलिसांनी कळवण शहरातून धिंड काढली. यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. न्यायालयाने या सर्वांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले तसेच त्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसण्यास मदत होईल,अशी शक्यता वर्तवली जात आहे.