नाशिक – संततधारेतच ढोल-ताशांच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या… ही साद घालत गणेशभक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. जवळपास १४ तासांहून अधिक काळ चाललेल्या मुख्य मिरवणुकीत २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी झाली होती. संबंधितांनी ढोल ताशा पथक, बँजो पार्टी, सटाणा ढोल आदींच्या सहाय्याने मिरवणूक काढली. सहा मंडळांनी आवाजाच्या भिंती आणि ढोल ताशा पथक असा दुहेरी मार्ग अवलंबला.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पहिल्या मानाच्या गणपतीची आरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली. यात मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री या देखील उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या.
मागील काही वर्षात बहुतेकांचा कल पारंपरिक वाद्याने मिरवणूक काढण्याकडे राहिला आहे. यामुळे शहरात ढोल पथकांची संख्या दरवर्षी वाढत असून सध्या ती ४० च्या आसपास असल्याचा अंदाज आहे. ढोल वादनाकडे तरुणाई मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आहे. ढोल पथकात केवळ महाविद्यालयीन विद्यार्थीच नव्हे तर, नोकरदार, व्यावसायिक आदींचाही समावेश असल्याचे पथकांकडून सांगितले जाते. विशेष म्हणजे पथकातील काही सदस्य बाहेरगावी नोकरीला आहेत.
विसर्जन मिरवणुकीतील वादनासाठी ते खास मुंबई, पुण्याहून नाशिकला येतात. एका ढोल पथकात किमान ५० ढोल आणि २० ते २५ ताशे असतात. ढोलच्या तालावर ध्वज हाती घेऊन नाचणारे ध्वजधारी म्हणून ओळखले जातात. प्रत्येक ढोल पथकात एक मानाचा ध्वज असतो. त्याची उंची अन्य उपध्वजापेक्षा अधिक असते. मिरवणुकीत मुख्य ध्वजाची खूप काळजी घेतली जाते. पथकात ध्वजधारी, ढोलवादक, टोलवादक, हलगी, संबळ व अन्य वाद्य वाजविणारे आदींचा समावेश असतो.
विसर्जन मिरवणुकीतील पारंपरिक वाद्यांकडे मनपा आयुक्त मनिषा खत्री यादेखील आकर्षित झाल्याचे पहायला मिळाले. मुख्य मिरवणुकीत महानगरपालिका मंडळाचा मानाचा पहिला गणपती असतो. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि गणरायाची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. या मंडळात ढोल ताशा पथकाचा समावेश होता. मनपा आयुक्त मनिषा खत्री ध्वजधारी बनल्या. पथकातील भगवा ध्वज हाती घेऊन त्यांनी ढोलच्या तालावर तो डौलाने फडकवला. नंतर काही वेळ त्यांनी ढोल वादनाचाही आनंद घेतला.
खुद्द आयुक्त ढोल वाजवू लागल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचे पहायला मिळाले. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह विभागप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.