नाशिक : भाजपकडून शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी, माजी नगरसेवकांनाही आपल्याकडे खेचून स्वबळावर महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. मतदान केंद्रस्तरीय समित्यांचे (बूथ समिती) जाळे मजबूत करीत प्रत्येक घरापर्यंत भाजपचा सदस्य पोहोचेल, याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. मित्रपक्षाच्या या तयारीला शिवसेनेने (एकनाथ शिंदे) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र व धनुष्यबाण असणाऱ्या भगव्या व पांढऱ्या रंगाच्या छत्री वाटपातून शह देण्याची तयारी केल्याचे दिसत आहे.

अलीकडेच ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागूल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हाच मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका निवडणुकीत राज्यात नाशिकमधून भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याचा विक्रम करायचा असल्याचे म्हटले होते. गतवेळी भाजपच्या ६७ जागा होत्या. यावेळी १२२ पैकी १०० चा आकडा पार करायचा असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपने १०४७ मतदान केंद्रांपैकी ९६.५० टक्के बूथ समित्यांची स्थापना केली. एका समितीत १२ सदस्यांचा समावेश असतो. या माध्यमातून साडेबारा हजारहून अधिक सदस्यांना १२२ प्रभागांत सक्रिय केले जात आहे. ही एकंदर स्थिती पाहता नाशिकमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

मित्रपक्ष शिवसेनेने (शिंदे) सावधपणे तयारी सुरू केली आहे. शहरातील काही भागात नागरिकांच्या हाती दृष्टीपथास पडणाऱ्या भगव्या-पांढऱ्या रंगातील पावसाळी छत्र्या हे त्याचेच द्योतक आहे. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा आणि शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण आहे. महत्वाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक, प्रामुख्याने हास्य क्लबचे सदस्य व भजनी मंडळांतील महिलांच्या हाती शिवसेना शिंदे गटाने वितरित केलेल्या पावसाळी छत्र्या दिसतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून पावसाळी ऋतुच्या अनुषंगाने छत्री वाटप योजना प्रभाग क्रमांक २४ मध्ये राबविण्यात आल्याची माहिती नाशिकचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी दिली. आतापर्यंत हिंदुह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण येथील हास्य क्लब व ज्येष्ठ नागरिक, महाराणा प्रताप चौक येथील हनुमान मंदिरातील महिला भजनी मंडळ आणि औदूंबर थांबा येथील श्री सिद्धेेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या महिला भजनी मंडळातील सदस्यांना छत्री वाटप करण्यात आल्या. नाशिकमध्ये दोन महिन्यांपासून संततधार सुरू असून पुढील दोन महिने ती कायम राहण्याची शक्यता आहे. या काळात शिवसेना शिंदे गटाचा शहरात आपसूक प्रचार होणार असल्याचे चित्र आहे.