नाशिक – पाळीव कुत्र्याला ७५ वर्षांचे वृद्ध मालक नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला घेऊन गेले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या वाहनाची धडक बसल्याने कुत्रा गंभीर जखमी झाला. अपघातप्रसंगी कुठलीही मदत न करता वाहनचालक पळून गेला. मालकाचे कुत्र्याशी भावनिक नाते होते. मालकाने जखमी कुत्र्याला वाचविण्यासाठी प्रथम स्थानिक रुग्णालयात नेले. नंतर मुंबईला देखील नेले. परंतु, तो वाचू शकला नाही. कुत्र्याचा मृत्यू झाला. जिवापाड प्रेम करणाऱ्या पाळीव कुत्र्याच्या अपघाती मृत्युमुळे अस्वस्थ वृध्दाने अखेर पोलीस ठाणे गाठले.

पाच ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता कामगारनगर भागात ही घटना घडली होती. याबाबत सतीश रस्तोगी (७५, सिरीन मेडोज, आनंदवल्ली, गंगापूर रोड) यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून कुत्र्याच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याने वाहनधारकाविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार रस्तोगी हे निवृत्त प्राध्यापक आहेत.

सकाळी ते जॉनी या पाळीव कुत्र्याला फिरण्यासाठी घेऊन गेले होते. पाईपलाईन रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपसमोर मागून भरधाव आलेल्या मालवाहू वाहनाने कुत्र्याला उडवले. चालकाने बेजबाबदारपणे गाडी चालवली, कुत्र्याला जखमी करून त्याच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कुत्र्याला उडवल्यानंतर वाहनधारक मदतीसाठी थांबला नाही. तो पळून गेला.

जखमी कुत्र्याला रस्तोगी यांनी स्थानिक रुग्णालयात नेले. कुत्र्याची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे त्यांनी नंतर त्याला मुंबईलाही नेले आटोकाट प्रयत्न करूनही कुत्रा वाचू शकला नाही. ऑक्टोबर अखेरीस त्याचा मृत्यू झाला. पाळीव कुत्र्याचा अपघाती मृत्यू रस्तोगी यांना अस्वस्थ करणारा ठरला. जॉनी या पाळीव कुत्र्याशी त्यांचे भावनिक बंध होते. वृद्धापकाळात तो जणू त्यांचा एकप्रकारे आधार होता..

कुत्र्याचा मृत्युनंतर रस्तोगी हे सातपूर पोलीस ठाण्यात पोहोचले. आपल्या पाळीव कुत्र्याच्या मृत्युस संबंधित वाहनधारक जबाबदार असून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली. रस्तोगी यांचे पाळीव कुत्र्याशी असणारे ऋणानुबंध पाहून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. घटनास्थळाभोवतीच्या सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी करून धडक देणाऱ्या वाहनधारकाचा शोध घेण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.