नाशिक – पंचवटीतील पेठ रस्त्यावरील राहुलवाडी भागात सराईत गुन्हेगार सागर जाधव याच्यावर दोन गुंडांनी गोळीबार केल्याच्या कटात भाजपचे महापालिकेतील माजी गटनेते जगदीश पाटील यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. सोमवारी त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता पाच दिवसांची म्हणजे २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मागील महिन्यात नांदूरनाका येथे टोळक्याच्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अलीकडेच अटक झाली होती. अवघ्या काही दिवसांत भाजपच्या दोन माजी नगरसेवकांना अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राहुलवाडी येथील गोळीबाराची घटना टोळीयुद्धातून झाल्याचे सांगितले जाते. पंचवटीत २०१७ मध्ये किरण निकम याचा खून करण्यात आला होता. निकम टोळीतील संशयित विकी वाघ आणि विकास वाघ या दोघांनी १६ सप्टेंबरच्या रात्री दुचाकीने येवून सागर जाधववर गोळी झाडली होती. यात जाधव गंभीर जखमी असून तो रुग्णालयात आहे.

या प्रकरणी ११ संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून गोळीबाराच्या कटात माजी नगरसेवक जगदीश पाटील यांचे नाव उघड झाले. नाशिकरोड येथील एका लॉजमध्ये संशयितांची बैठक झाली. आणि तिथे जाधववरील हल्ल्याचा कट रचला गेला. यावेळी माजी नगरसेवक पाटीलही तिथे होते. संशयित आणि त्यांच्यात भ्रमणध्वनीवर संवाद झाल्याचे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात रोहन भुजबळ यालाही ताब्यात घेण्यात आले असून आतापर्यंत अटक झालेल्या संशयितांची संख्या १३ झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दिली.

कुंभमेळामंंत्री गिरीश महाजन हे रविवारी नाशिक दौऱ्यावर होते. त्याच दिवशी माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्यावर कारवाई झाली. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री महाजन यांनी ते भाजपचे माजी नगरसेवक असल्याचे नमूद करीत या घटनेबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जाईल. या प्रकरणात कोणाला वाचविण्याचा प्रयत्न नाही. जे दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल, असे स्पष्ट केले. उपरोक्त घटना कोणी केली, कशामुळे केली, याबद्दल चौकशी सुरू आहे. मुळात अशा गोष्टी घडताच कामा नये. त्याचे कोणी समर्थन करीत नाही. असेही महाजन यांनी नमूद केले.