नाशिक – सातपूर येथील हॉटेल गोळीबार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पदाधिकारी प्रकाश लोंढे याची रविवारी पोलीस कोठडी संपल्यावर पोलिसांनी त्याच्यासह निवासस्थानाची तपासणी केली असता घरात भुयार आढळल्याने पोलीसही चक्रावले. या भुयारात काही शस्त्रे आढळून आल्याने लोंढेच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक भेटीदरम्यान पोलिसांना गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आदेश दिल्याने पोलीस आक्रमक झाले असून राजकीय पाठबळ असलेल्या गुन्हेगारांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित भूषण लोंढे फरार आहे. पोलिसांनी त्याचे वडील आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पदाधिकारी प्रकाश लोंढे, भूषणचा भाऊ दीपक लोंढे यांना सहआरोपी करत ताब्यात घेतले.
न्यायालयाने त्यांना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. रविवारी पोलीस कोठडी संपल्याने सातपूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा पथकाने प्रकाश लोंढे याला त्याच्या घरी नेले. त्याच्या घराच्या तपासणीत भुयार आढळल्याने पोलीस हादरलेच. पोलिसांनी तो परिसर सील केला असून भुयारात दोन कुऱ्हाड तसेच एक चाकु आढळला.
दरम्यान, शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी शहर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. वेगवेगळ्या गुन्हेगारीतील संशयितांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली असल्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले. पोलिसांच्या कारवाया सुरू असतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठिंबा दिल्याने राजकीय दबाव राहिलेला नाही. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्ष, अन्य पक्षाच्या राजकीय गुन्हेगारांवरही कारवाई सुरू असल्याचे कर्णिक यांनी सांगितले. याशिवाय फलकबाजीवरही आळा घालण्यात येत असून या माध्यमातून दहशत पसरविणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. याबाबत नाशिक महानगरपालिकेशी चर्चा झाली असून पुढील काळात ही कारवाई कठोर करण्याचा इशारा कर्णिक यांनी दिला.
सातपूर गोळीबार प्रकरणात रविवारी प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, संतोष पवार, अमोल पगारे, देवेश शिरताटे. शुभम गोसावी यांच्यासह अन्य तीन जणांची पोलीस कोठडी रविवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. भूषण लोंढेचा शोध सुरू आहे. लोंढे याच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्या घरात भुयार आढळले. हे भुयार खाली तळमजल्यावर दोन खोल्यांपुरता मर्यादित आहे. पोलिसांनी तो परिसर सील केला आहे. या ठिकाणी दोन कुऱ्हाड तसेच एक चाकु आढळला. हे हत्यार का आणले, त्याचा कुठे वापर झाला याचा तपास सुरू आहे. भूषण हा उत्तर-पूर्वेतील राज्यांकडे गेला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. – किशोर काळे (पोलीस उपायुक्त, नाशिक)