नाशिक – नाशिक पुरोहित संघाच्या सर्वसाधारण सभेत ३८ वर्षानंतर नव्याने सभासद नोंदणी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. मागील सिंहस्थात पुरोहित संघाकडे २२५ तीर्थ पुरोहितांची नोंद होती. नवीन सभासद नोंदणी निर्णयामुळे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून रामकुंडावर येणाऱ्या भाविकांना पूजाविधींसाठी अधिक संख्येने तीर्थपुरोहित उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये येतील, असा प्रशासकीय यंत्रणेचा अंदाज आहे. तुलनेत पूजा-विधीसाठी पुरोहितांची संख्या मर्यादित आहे. गोदावरीच्या काठावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील मुख्य तीन पर्वण्यांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार दोन्ही ठिकाणी प्रथम आणि द्वितीय पर्वणी एकाच दिवशी अनुक्रमे दोन ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट रोजी आहे.
नाशिकमध्ये तृतीय पर्वणी ११ सप्टेंबर रोजी तर, त्र्यंबकेश्वर येथे १२ सप्टेंबर रोजी राहणार आहे. मुख्य पर्वण्यांबरोबर सिंहस्थ काळात त्र्यंबकेश्वर येथे तीर्थस्नानाचे २९ आणि नाशिकमध्ये ४५ विशेष मुहूर्त जाहीर करण्यात आले. या व्यतिरिक्त सिंहस्थ पर्वकाळातील सर्व एकादशी, पौर्णिमा, अमावस्या, वैधृती-व्यतीपात योग आदी दिवस हे भाविकांसाठी तीर्थस्नान, दर्शन पर्व असतील. कुंभमेळ्याचा समारोप २४ जुलै २०२८ रोजी ध्वजावतरणाने होणार आहे. आगामी कुंभमेळ्याचा कालावधी मोठा असल्याने गतवेळच्या तुलनेत तीर्थस्नानाचे दिवस अधिक आहेत.
या कुंभमेळ्यात गोदावरी काठावर गतवेळच्या तुलनेत अधिक पुरोहित लाभण्यास नाशिक पुरोहित संघाचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. संघाच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत माजी अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्याविरोधात अनेक गंभीर तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. शुक्ल हे जवळपास चार दशके संघाचे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात नवीन सभासद नोंदणी झाली नाही. त्यांच्या कारभाराला वैतागून मागील महिन्यात त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. सर्वसाधारण सभेत पुरोहित संघाचे अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर पंचाक्षरी यांना सर्वांनी पाठिंबा दिला. याच सभेत ३८ वर्षानंतर नव्याने सभासद नोंदणी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. पुरोहित संघाचे संघटन मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्याचा भाविकांनाही लाभ होणार आहे.
पौरोहित्याचा अधिकार कोणाला ?
ज्यांच्यांकडे पूर्वापार वंशावळी आहेत, अशी तीर्थ पुरोहितांची नाशिकमध्ये ३५० घराणी आहेत. ते रामकुंड तीर्थावर पौरोहित्य करू शकतात. मागील सिंहस्थात पुरोहित संघाकडे २२५ सभासद अर्थात पुरोहितांची नोंद आहे. रामकुंडावर वर्षभर विविध पूजाविधींसाठी भाविकांचा राबता असतो. संघाने नोंदणी सुरू केल्यामुळे सभासद आणि पर्यायाने तीर्थ पुरोहितांची संख्या वाढणार आहे.
भाविकांना लाभ
तीर्थ पुरोहितांकडे देशातील वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या भाविकांची वंशावळी असते. विशिष्ट समाजघटकांचे तीर्थ पुरोहित निश्चित आहेत. नाशिकला तीर्थाटनाला येताना संंबंधितांकडून आपल्या तीर्थ पुरोहितांना पूर्वकल्पना दिली जाते. मग येथे पूजाविधी केली जाते. पुरोहित संघाच्या नव्या सभासद नोंदणीचा लाभ सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांना निश्चितपणे होईल असे नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी सांगितले.