नाशिक : कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावर शनिवारी रात्रभर संततधार सुरु राहिली. रविवारी सुट्टी असतानाही पावसामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली नाही. सततच्या पावसामुळे भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे भाविकांच्या संभाव्य गर्दीचा अंदाज बांधून जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाने सप्तश्रृंगी ट्रस्ट, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने अडथळे उभारणीचे नियोजन करण्यात आले होते. रविवारी पावसातच षष्टी कार्यक्रमाला सुरूवात झाली. ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून निघालेल्या अलंकार मिरवणुकीत ट्रस्टचे माजी अध्यक्ष तथा न्यायाधीश बी.व्ही. वाघ हे सपत्नीक सहभागी झाले होते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि नाशिक जिल्हा पालक न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी सपत्नीक महापूजा केली. देवीला लाल रंगाची पैठणी नेसविण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी, तहसीलदार रोहिदास वारुळे, विश्वस्त ललित निकम, मनज्योत पाटील, व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे आदी उपस्थित होते.

सततच्या पावसामुळे बस स्थानक परिसरात चिखल झाला. बऱ्याचदा चिखलात गाड्या रुतत आहेत. खासगी प्रवासी वाहने गडावर नेण्यास बंदी आहे. व्यावसायिक भाग्यश्री गरड यांनी पावसामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याचे सांगितले, पहिल्या माळेपासून पाऊस आहे. आम्ही फुलांच्या माळा विकतो. पण आता यात्रा पहिल्यासारखी भरत नाही. त्यात पाऊस असल्याने माल खराब होऊ नये यासाठी धावपळ होते, असे त्यांनी सांगितले. बाकिस भोसले यांनी, नवरात्र उत्सवात पहिल्या माळेपासून भाविकांची संख्या वाढत असल्याचा अनुभव असल्याने त्यादृष्टीने यंदा उधारीने माल भरून ठेवला. परंतु, संततधारेमुळे थोडाच माल विकला गेला. उधारीचे पैसे कसे द्यायचे, याची चिंता त्यांना आहे. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चित्र बदलेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.