Ganeshotsav 2025 : नाशिक – शतकोत्तर वाटचाल करणारे नाशिककरांचा मानाचा गणपती म्हणून प्रसिध्द असलेले रविवार कारंजा गणेश उत्सव मंडळ सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ओळखले जाते. गणेश उत्सवाचा मूळ हेतू या मंडळाने कायमच जपला आहे.
मंडळाने सुरूवातीला शाडु मातीची मूर्ती तयार केली होती. त्यानंतर विजय पवार आणि विजय भोसले यांच्या संकल्पनेतून ११ किलो चांदीची मूर्ती तयार करण्यात आली. यानंतर वेगवेगळ्या कारणांनी चांदीच्या मूर्तीमध्ये भर पडत गेली. १९८५ पासून सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरूवात झाली. प्रारंभी राष्ट्रीय एकात्मतादिनी घेण्यात आलेल्या शिबिरात ३५ बाटल्या रक्त जमा झाले होते. तसेच बाल निरीक्षणगृहाच्या (रिमांड होमच्या) विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने गॅस संच घेण्यासाठी १५०१ रुपयांची मदत देण्यात आली होती.
यशवंत मंडई येथे साडेचारशे लिटर क्षमतेची पाणपोई उभारण्यात आली. परिसरातील तरुणांना रोजगार मिळावा आणि व्यापारी वर्गाला सुलभ कर्ज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सिद्धिविनायक नागरी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यकर्त्यांनी १५० किलो चांदीची मूर्ती करण्याचा संकल्प सोडला. लातूर भागात झालेल्या प्रलयकारी भूकंपावेळी मदतीसाठी मंडळाच्या वतीने १२ तासात एक लाख ३१ हजार रुपये इतका निधी जमा करण्यात आला होता. याशिवाय मालमोटार भरून जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या होत्या. मंडळाचे कार्यकर्ते दोन ते तीन दिवस त्या भागात तळ ठोकून प्रत्यक्ष मदत कार्यात सहभागी झाले होते.
काही वर्षांपूर्वी सांगली येथील पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्यांना रविवार कारंजा गणेश उत्सव मंडळ मंडळाने मदत केली. नाशिक येथे काही वर्षांपूर्वी गोदावरी नदीला मोठा पूर आला असता मल्हारखाण आणि गंगावाडी या गोदाकाठलगतचा परिसर पाण्याखाली गेला होता. त्यावेळी पूरग्रस्तांना दोन दिवस राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था तसेच त्यांना आठ दिवस पुरेल इतके धान्य मंडळाकडून देण्यात आले होते.
मंडळाच्या वतीने ९६-९७ पासून पुण्याच्या सवाई गंधर्व उत्सवाप्रमाणे माघी गणेशोत्सव साजरा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्याप्रमाणे पुढील तीन ते चार वर्षात श्रीधर फडके, हृदयनाथ मंगेशकर, आनंद माडगूळकर, अरुण दाते, पंडित हरिप्रसाद चौरसिया, अनुप जलोटा, बालकीर्तनकार, सुशांत महाराज, आरती अंकलीकर टिकेकर यांसह दिग्गजांचे कार्यक्रम मंडळाच्या वतीने घेण्यात आले कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्यांना मंडळाच्या वतीने मदत करण्यात आली.
मंडळाने आरोग्य क्षेत्रात सेवा देण्याचे ठरवत सिद्धिविनायक धर्मार्थ दवाखान्याची मुहूर्तमेढ रोवली. परिसरातील कित्येक नागरिक या दवाखान्यात उपचार घेतात. धर्मार्थ दवाखान्याच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने नाशिक मध्यवर्ती कारागृहातील ९०० कैद्यांची शारीरिक तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार व चष्मे वाटप करण्यात आले.
२०१५-१६ या वर्षी सिंहस्थ कुंभमेळ्यात रविवार कारंजा परिसरात मंडळाच्या वतीने आठ सीसीटीव्ही कॅमेरे तसेच मंदिर परिसरात सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. भारताच्या विविध भागातून आलेल्या भाविकांना फळ आणि पाणी वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय आरोग्य शिबीर आणि अत्यावश्यक सुविधा पुरवल्या जात होत्या .पोलीस प्रशासनच्या २०० कर्मचाऱ्यांना राहण्याची आणि विश्रांतीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती.
करोना काळातही मंडळ सक्रिय होते गरजूंसाठी जेवण, पाणी, औषधोपचार व शिधा तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत यासह, रक्तदान, आरोग्य शिबीर आणि इतर सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीने वर्षभर राबविण्यात येतात. त्यामुळे नाशिकमधील रविवार कारंजा गणेश उत्सव मंडळ सर्वांसाठी एक आदर्श झाले आहे.