नाशिक – दडपशाही कार्यशैलीने सातपूर, अंबड, सिडको परिसरात दबदबा निर्माण करणारे लोंढे पिता-पुत्र यांच्याविरुध्द कारवाई केल्याने नाशिक पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे. पोलिसांविषयी विश्वास वाटू लागल्याने इतके दिवस लोंढे टोळीची दहशत सहन करणारे आता पोलिसांकडे आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचू लागले आहेत. लोंढे पिता-पुत्रांचे एकेक दूष्कृत्य ऐकून पोलीसही हादरले आहेत.
सातपूर येथील गोळीबार प्रकरणात भूषण लोंढे याच्यासह अन्य साथीदारांची नावे उघड झाली. सातपूर पोलिसांनी या प्रकरणात धरपकड सुरू केल्यानंतर भूषण फरार झाला. या प्रकरणात पोलिसांनी प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक याला सहआरोपी केले. त्यांना स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणत लोंढे पिता-पुत्राला दिवाळीआधीच पोलिसांकडून फराळ मिळाला. लोंढे याला सातपूर गोळीबार प्रकरणानंतर अंबड पोलिसांनी खंडणी प्रकरणात ताब्यात घेतले. सातपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ११ जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी लोंढे पिता-पुत्राकडून नाशिक जिल्हा- कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेतले. यानंतर लोंढेविरुध्द तक्रारींची मालिका सुरु झाली आहे.
सातपूर परिसरातील महादेववाडीसह अन्य ठिकाणी लोंढेने स्वत:चे साम्राज्य निर्माण केले. आपल्या राजकीय बाहुबलाचा वापर करत स्थानिकांना, व्यावसायिकांना तसेच अन्य लोकांवर दडपशाही केली. अनेकांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. काही जणांकडे खंडणी मागितली. स्थावर मालमत्ता बळकावली. पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे लोंढेच्या दडपशाहीविरोधात तक्रारदार पुढे येऊ लागले आहेत. काहींनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे सहायक उपआयुक्त संदीप मिटके, उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्याकडे गाऱ्हाणी मांडण्यास सुरूवात केली.
१० ते १२ वर्षे जुनी प्रकरणेही तक्रारदार मांडू लागले आहेत. विविध कलमांतंर्गत लोंढेवर नव्याने गुन्हे दाखल होत आहेत. एक वृध्देने पोलिसांकडे लोंढेने तिच्यावर कसा अन्याय केला, ते मांडले. सातपूर परिसरात तिची जागा होती. त्यांना दोन मुले आहेत. लोंढेने वृध्देला जागा तुझ्या दोन्ही मुलांच्या नावाने करतो, असे सांगत जागा स्वत:च्या नावावर केली. हा प्रकार लक्षात आल्यावर त्या वृध्देने आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, गरीबीमुळे तसेच लोंढे टोळीच्या दडपशाहीपुढे आवाज दबला गेला. आपल्याला पोलीस न्याय देतील, अशी आस वृध्देला आहे.
काही परप्रांतीय कुटूंब सातपूर झोपडपट्टीत राहण्यासाठी आले होते. पती कामावर गेल्यावर घरी महिला एकट्या असतांना दीपक लोंढे किंवा त्याचे मित्र अचानक घरात घुसून त्यांचे विविध माध्यमातून शोषण करत होते. याविषयी कोणाकडे तक्रार केल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने त्या अन्याय सहन करत राहिल्या. काही लोकांनी आपल्या घराचा ताबा लोंढे पिता-पुत्राने घेतल्याची तक्रार केली आहे. सांगेल त्या किंमतीला स्थावर मालमत्तेची विक्री, खरेदी करण्यास भाग पाडले. मात्र त्याचा मोबदला मिळाला नाही, अशाही तक्रारी काहींनी केल्या. काहींनी लोंढे टोळी घरात घुसत महिला, पुरूषांना उचलून घेऊन जात, अशा तक्रारी केल्या.
