नाशिक : ऑनलाईन फसवणूक प्रकरणात दोन लाख रुपये तक्रारदारास परत मिळवून देण्यात नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांना यश आले. अहमदाबाद येथून संशयिताला अटक करण्यात आली आहे. प्रमोद यादव (३६, रा. धामणगाव) यांच्याशी संशयितांनी संपर्क साधून एका व्हॉट्स अप गटात त्यांना सामील करुन घेतले. त्यानंतर प्रिती शेख नावाच्या महिलेने ठराविक कामगिरी केल्यास पैसे मिळतील, असे सांगितले. नंतर यादव यांच्या खात्यातून वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाईन सहा लाख २१ हजार रुपये परस्पर काढून घेतले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नागेश मोहिते आणि सहकाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषण तसेच अन्य माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला. संशयिताला गुजरातमधील अहमदाबाद येथून अटक केली. संशयित मन्सुरी मोहम्मद कैफ (२०, रा. रहेमत नगर) याला अटक केली. त्यामुळे यादव यांना त्यांचे दोन लाख रुपये परत मिळवून देण्यात यश आले. नागरिकांनी अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याचा तपशील देऊ नये. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती विचारत नाही. बँक खात्याविषयी माहिती विचारल्यास स्वत: बँकेत जावून चौकशी करावी, कोणतीही लिंक पाहण्याचा प्रयत्न करु नये. मनीलॉंड्रिंगमध्ये डिजीटल अरेस्ट असा काही प्रकार नसतो. आपल्या गुंतवणूकीविषयी कुठल्याही अनोळखी व्यक्तीबरोबर चर्चा करू नये. तसेच जादा पैसे मिळवून देण्याच्या कोणत्याही योजना, आमिषांना बळी पडू नये. कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास लागलीच जवळील पोलीस ठाणे किंवा सायबर पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

याआधीही पैसे मिळवण्यात यश

एका नामांकित कंपनी मध्ये कामास असलेल्या युवकाला ऑनलाईन ट्रेडिंगचे आमिष दाखवत आभासी खाते तयार करत त्याच्या खात्यातील काही रक्कम गुंतवण्यास सांगितले. सुरूवातीला परतावा दिला गेला. गुंतवणुकीची रक्कम आणि परतावा वाढत असतांना युवकाने आपली मुळ रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी टास्क चुकला सांगत त्यांना कर भरण्यास सांगितले. पण कर भरण्यासाठी असे सांगितल्यावरून त्याला आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. या विषयी त्याने सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता त्या नुसार काही रक्कम गोठवण्यात सायबर पोलीसांना यश आले. याशिवाय एक शेतकरी जो अल्पभूधारकर आहे. त्याने आपल्या मित्रांकडून काही रक्कम घेत २० लाखांहून अधिक रक्कम गुंतवली. त्याचा मोबदला मागितला असता आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले असता त्याने सायबर पोलीसांशी संपर्क केला. या सगळ्यात त्याची काही रक्कम गोठवण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर सायबर ग्रामीण पोलीसांनी स्वत: हेल्पलाईन तयार केली आहे.