नाशिक – नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग भिवंडी तालुक्यातील आमणे येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. आठपदरी समृद्धी महामार्गावरून भरधाव येणारे वाहनधारक चारपदरी मुंबई-आग्रा महामार्गावर आमणे येथे पोहोचल्यावर कोंडीत अडकतात. कारण, महामार्गावरील आणि समृद्धी महामार्गावरील वाहने या ठिकाणी एकत्र येतात. त्यामुळे आमणे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडविण्यासाठी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आमणे येथे व्यापक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेऊन रस्ता रुंदीकरण करावे, अशी मागणी नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (निमा) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन नाशिक-मुंबई प्रवासात समृद्धीवरून प्रवास करताना टोलचा पडणारा दुहेरी भुर्दंड, चेन्नई-नाशिक-सुरत या द्रुतगती महामार्गाला गती देणे, नाशिक-पुणे महामार्गाची दयनीय स्थिती, दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेच्या दुसरा टप्प्यात नाशिकचा समावेश करणे आदी विषय निवेदनातून मांडले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७६ किलोमीटरच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण महिनाभरापूर्वी झाले. हा टप्पा वाहतुकीस सुरू झाल्यामुळे नाशिकहून मुंबईला ये-जा करणारे वाहनधारक इगतपुरीहून समृद्धी महामार्गाने प्रवास करतात.
समृद्धी महामार्ग आमणे येथे पुन्हा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. तिथे वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. याकडे निमाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले. नाशिकहून मुंबईला घोटी टोल नाका किंवा समृद्धी महामार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना १४० रुपयांचा अतिरिक्त टोल द्यावा लागतो. म्हणजे दोन्ही ठिकाणी टोल देणे भाग पडते. अशी टोल आकारणी चुकीची असून वाहनधारकांना दिलासा देण्याचा निर्णय व्हावा, अशी मागणी करण्यात आली. बैठकीत निमाचे अध्यक्ष नहार यांच्यासह सचिव राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष मनीष रावल, खजिनदार राजेंद्र वडनेरे, मिलिंद राजपूत, कैलास पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बहुमजली उड्डाण पूलाचा विसर ?
चेन्नई-नाशिक-सुरत या हरित द्रुतगती महामार्गास गती देऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी केली. काही वर्षांपूर्वी गडकरी यांनी द्वारका चौक ते नाशिकरोड बहुमजली उड्डाणपूल आणि यात मेट्रोसाठी मार्गिकेची घोषणा केली होती. या प्रकल्पाला चालना मिळाली नसल्याची बाब शिष्टमंडळाने गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेच्या दुसरा टप्प्यात नाशिकचा समावेश करण्यासाठी शिफारस करण्यावर चर्चा झाली. गडकरी यांनी सर्व बाबी जाणून घेत लवकरात लवकर प्रलंबित कामे मार्गी लागणार असल्याचे आश्वासन दिले.
खड्ड्यांमुळे असुरक्षितता
नाशिक-पुणे महामार्गाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. खड्ड्यांचे साम्राज्य व असुरक्षित मार्गामुळे अपघातांचा धोका वाढतो. माल वाहतुकीलाही विलंब होतो. आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन या रस्त्याची तसेच नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी, दीर्घकालीन पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निमाकडून करण्यात आली.