नाशिक : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतर्फे इगतपुरीतील आडवण येथे ३५० एकर क्षेत्रावर नवीन प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पातून सुमारे एक हजार प्रत्यक्ष तर, दीड हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. या प्रकल्पासाठी आडवण येथे ३५० एकर जागेला महिंद्रा कंपनीने संमती दिल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

सोमवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री सामंत यांनी निमा संघटनेच्या कार्यालयात भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिंद्राच्या मागणीनुसार जागा देण्यास उद्योग विभाग सकारात्मक असून, जागासुद्धा निश्चित झाल्याचे नमूद केले. महिंद्राला त्यांच्या प्रकल्पासाठी जी जागा दिली जात आहे, त्याने कुणाचेही नुकसान होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिंद्राने प्रकल्प विस्तारासाठी एकूण ५०० एकर जागेची मागणी केली होती. परंतु , आता या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात मिळालेली साडे तीनशे एकर जागेसाठी महिंद्राने होकार दिल्याचे सामंत यांनी नमूद केले. या संदर्भातील पत्र सामंत यांनी निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांना दिले.

सीईटीपी प्रकल्प साकार होणार

पर्यावरणाच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या सीईटीपी प्रकल्पाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. मात्र तो टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सूचित केले. निधीअभावी जिल्ह्यातील कोणताही प्रकल्प व सुविधा रखडणार नाही. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जागा संपादित केल्यानंतर संरक्षण सामग्रीची केंद्र व इलेक्टीकल क्लस्टरबाबत विचार करता येईल असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी नाशकात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र, सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्राची जलदपणे उभारणी, ‘सीपीआरआय’ प्रयोगशाळा कार्यान्वित करणे, शुष्क बंदर प्रकल्पाला गती देऊन स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.

महिंद्राच्या नवीन प्रकल्पाची घोषणा म्हणजे नाशकात मोठे प्रकल्प येण्याच्या दृष्टीने हा श्रीगणेशा असल्याची प्रतिक्रिया नहार यांनी व्यक्त केली. संवाद बैठकीत शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषधेमंत्री नरहरी झिरवळ, आ.सीमा हिरे, आ.हिरामण खोसकर, आ.सरोज अहिरे, आयमाचे अध्यक्ष ललित बूब, चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे,लघू भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया, राजेंद्र अहिरे आदी होते.