नाशिक : जिल्ह्यातील गुन्हे दाखल झालेले नेते, प्रमुख पदाधिकाऱ्यांचे भाजप प्रवेशाचे सत्र कायम असून मारहाण, चोरीच्या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करणारे शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) उपनेते सुनील बागूल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांचा गुरुवारी होणारा संभाव्य प्रवेश ऐनवेळी स्थगित झाला.

फरार संशयित भाजपमध्ये प्रवेश घेत असल्याने खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडल्यानंतर तूर्तास उभयंतांचे प्रवेश पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, ठाकरे गटाने पक्षविरोधी कारवाया केल्यावरून उपनेते बागूल आणि महानगरप्रमुख राजवाडे यांची हकालपट्टी केली. नाशिक महानगरप्रमुखपदी माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांची नियुक्ती करण्यात आली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप आणि शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) ठाकरे गटाला सुरुंग लावल्याचे चित्र आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या समवेत पार्टी केल्याच्या प्रकरणातील संशयित ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मध्यंतरी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मालेगावच्या व्यंकटेश सहकारी बँकेत घोटाळा केल्याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेले संशयित माजी आमदार अपूर्व हिरे हे देखील भाजपवासी झाले. हिरे हे गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) दाखल झाले होते.

ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल, महानगरप्रमुख मामा राजवाडे, लोकसभा संघटक भगवंत पाठक, माजी महानगरप्रमुख सचिन मराठे, माजी नगरसेवक कमलेश बोडके, श्रमिक सेनेचे जिल्हाप्रमुख अजय बागूल आदी भाजपच्या वाटेवर असल्याचे समोर आले. गुरुवारी त्यांचा प्रवेश सोहळा निश्चित झाला. उपनेते बागूल यांच्याविषयी समाज माध्यमात चित्रफिती प्रसारित केल्याच्या रागातून टोळक्याने घरात शिरून मारहाण केल्याच्या तक्रारीनंतर बागूल, मामा राजवाडे यांच्यासह सात जणांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणात बागूल आणि राजवाडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून पाच तारखेला त्यावर सुनावणी होणार आहे. गुरुवारी दुपारी त्यांच्यासह अन्य पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा प्रवेश निश्चित झाला होता. रात्री वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देऊन गुरुवारी मुंबईत बोलावून घेतले. दुसरीकडे ठाकरे गटाने बागूल आणि राजवाडे यांची पक्षविरोधी कारवाया केल्यावरून हकालपट्टी केली. महानगरप्रमुखपदी माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

प्रवेश का थांबले ?

ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टिकास्त्र सोडले. भाजपची जादू अतुलनीय आहे. कोणत्याही पक्षाला ती आवडत नाही. नाशिकच्या शिवसेना कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले. अटक टाळण्यासाठी ते फरार झाले. अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. पोलिसांनी मकोका लावण्याची योजना आखल्याची बातमी आली. कमाल म्हणजे हे फरार भाजपमध्ये सामील होत आहेत. भाजपच्या धुलाई यंत्रात सर्व आरोप धुवून काढले गेल्याचा आरोप त्यांनी केल्यानंतर ऐनवेळी सुनील बागूल आणि मामा राजवाडे यांचे प्रवेश स्थगित करण्यात आले. उर्वरित माजी नगरसेवक व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे पक्ष प्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणेश गितेही भाजपमध्ये

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून (शरद पवार) भाजपविरोधात रिंगणात उतरून पराभूत झालेले गणेश गिते यांनीही स्वगृही म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणूक काळात गिते यांच्याकडून मतदारांना पैसे वाटप झाल्याचे आरोप झाले होते. त्यांच्या प्रवेशाला स्थानिक भाजप आमदारांसह पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. मात्र वरिष्ठांनी त्यांना शांत केले. त्यामुळे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले या प्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.