नाशिक – विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले असून मतदानासाठी जिल्ह्यातील बहुसंख्य शाळा जिल्हा प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मतदानामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांना तीन दिवसांची अघोषित सुट्टी असल्यासारखी परिस्थिती आहे. यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याने काही शाळा व्यवस्थापनाने त्यांच्या सोयीनुसार पर्यायी मार्ग शोधले आहेत.

विधानसभा निवडणुकीत बुधवारी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक शाळा मतदान केंद्र म्हणून प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. शिक्षकांवरही निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे शैक्षणिक वर्तुळात गोंधळाची स्थिती आहे. शिक्षक निवडणूक कामात व्यस्त असल्याने शाळांना १९, २० आणि २१ नोव्हेंबर या तीन दिवशी सुट्टी द्यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली होती. परंतु, शिक्षण आयुक्तांनी सरसकट सुट्टी जाहीर न करता शिक्षण अधिकाऱ्यांना आपआपल्या स्तरावर निर्णय घेण्यास सांगितले. यामुळे गोंधळात भर पडली आहे. मतदान बुधवारी होणार असले तरी मतदानासाठी आवश्यक साहित्य, केंद्र उभारणीसाठी शाळा आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी ताब्यात घेण्यात आल्या. वर्गातील बाकडे, मेज, खुर्ची, कपाट यासह अन्य फर्निचर, सामान हलविण्यात आले. केंद्रासाठी आवश्यक उभारणी करण्यात आली. स्वच्छतागृह, वर्गाची स्वच्छता यासह अन्य कामांमध्ये मंगळवारचा निम्मा दिवस गेला. शाळेचा वापर मतदान केंद्र म्हणून होणार असल्याने बहुतेक विद्यार्थी शाळेकडे फिरकलेच नाहीत. काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने तुकड्यांचे एकत्रीकरण करण्यात आले. मधल्या सुट्टीनंतर शाळा सोडून देण्यात आली.

हेही वाचा – नाशिक : आज, उद्या शहरातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद

मतदान पूर्ण होऊन निवडणुकीचे सर्व साहित्य बाहेर पडेपर्यंत शाळा प्रशासनाच्या ताब्यात राहणार आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी पूर्वनियोजित वेळेनुसार दोन सत्रात शाळा भरविण्याचे आव्हान शाळांसमोर आहे. शिक्षकांवरील निवडणूक कामाचा असणारा ताण, विद्यार्थ्यांना ने- आण करणारी खासगी वाहन व्यवस्था नसल्याने बहुतेक विद्यार्थी शाळेत अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – जळगाव जिल्ह्यात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात, चार जण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्याध्यापकांकडून पर्याय

या सर्व अडचणींचा विचार करता शालेय पातळीवर मुख्याध्यापकांनी पर्याय शोधले आहेत. सिन्नर येथील पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली. मंगळवारी अर्धवेळ शाळा घेतली. बुधवारी सुट्टी आणि गुरुवारी आम्ही नियमित शाळा भरवत आहोत. मात्र निवडणूक कामात गुंतलेल्या शिक्षकांना शाळेत येण्यासाठी एक ते दोन तासाची सवलत दिली असल्याचे देशमुख यांनी सांगितले. सिडकोतील सरस्वती गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील बिरारी यांनीही त्यांनी स्वीकारलेला पर्याय सांगितला. मंगळवारी अर्धवेळ शाळा घेतली. बुधवारी सुट्टी आणि गुरुवारी शिक्षकांवरील ताण, शाळेतील आवाराआवर पाहता मुख्याध्यापकांसाठी राखीव असलेल्या सुट्टीतून त्यादिवशीही सुट्टी घेतल्याचे नमूद केले. गुरू गोबिंदसिंग पब्लिक स्कुलच्या वतीने मंगळवारी अर्धवेळ तर गुरुवारी प्राथमिक विभागाला सुट्टी आणि माध्यमिक विभागासाठी अर्धवेळ शाळा नियोजित वेळ बदलून सुरू राहील, अशी माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली. काही शाळांमध्ये गुरुवारी सुट्टी की शाळा, याविषयी बुधवारी सायंकाळी उशिराने भ्रमणध्वनी संदेशाच्या माध्यमातून माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले.