नाशिक – जिल्हा परिषदेच्या सुपर ५० उपक्रमाच्या माध्यमातून आयआयटीत प्रवेश मिळवलेल्या सहा ग्रामीण विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा या जागतिक अंतराळ संशोधन संस्थेला तसेच अमेरिकेतील विविध शैक्षणिक व संशोधन संस्थांना भेट देण्याची संधी मिळाली आहे.

हा दौरा आठवडाभराचा आहे. विद्यार्थ्यांना नासाबरोबरच अमेरिकेतील अन्य विज्ञान-तंत्रज्ञान संस्था, संशोधन प्रयोगशाळा आणि विद्यापीठांना भेट देता येणार आहे. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक होईल. आणि जागतिक ज्ञानाशी त्यांची थेट नाळ जुळेल. या दौऱ्यात विद्यार्थ्यांबरोबर जिल्हा परिषदेतील एक शिक्षकही सहभागी होणार असून त्यांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे जागतिक शैक्षणिक व संशोधन प्रवासाचा अनुभव विद्यार्थांना घेता येणार आहे.

‘सुपर ५०’ प्रकल्पाची सुरुवात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून झाली. या प्रकल्पातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जेईई आणि नीटसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण, मार्गदर्शन यांसह सर्व सुविधा दिल्या जातात. हाच उपक्रम पुढे नेत आता मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी विद्यार्थ्यांना थेट नासात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांना देखील प्रेरणा मिळणार आहे.

याआधीही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची निवड झाली. या मध्ये आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. या प्रकल्पामुळे प्रशासकिय सेवेत कार्यरत होण्यासाठी ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना जागतिक पंख देण्यासाठीच ‘नाशिक ते नासा’ ही संकल्पना राबवली आहे. सुपर ५० उपक्रमातून आयआयटीत निवड झालेल्यांचा त्यात सहभाग करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दरवर्षी सातत्याने राबवला जाईल. विद्यार्थ्यांना अमेरिकेत जाऊन विज्ञान-तंत्रज्ञानाचा थेट अनुभव घेता येईल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल. ते मोठी स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात उतरवतील. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीही जागतिक दर्जाचे यश मिळवू शकतात, हे या उपक्रमातून सिध्द होईल. – ओमकार पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक).