नाशिक : इगतपुरी तालुक्यात आदिवासी क्रीडा प्रबोधिनी उभारणीसाठी जागा निश्चित करण्याची सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केली आहे. क्रीडा प्रबोधिनीसाठी शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शासकीय निवासी आश्रमशाळेत सोमवारी विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मंत्री डाॅ. उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यानिमित्त नाशिक येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पेसा क्षेत्रातील पदभरतीला सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्यामुळे शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये २०२५–२६ वर्षाच्या अखेरपर्यंत बाह्यस्रोतामार्फत शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी विकासाच्या अन्य योजना पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील, असे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील वर्ग तीन आणि वर्ग चार रोजंदारी कर्मचाऱ्यांनी नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयावर काढलेल्या बिऱ्हाड मोर्चासंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आंदोलन करून उपयोग होणार नाही. बाह्यस्त्रोत तत्वाला विरोध करू नये. आंदोलनकर्ते पात्र असतील तर त्यांनी परीक्षा द्यावी. उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना विभागाकडून बोलावण्यात येईल, असे डॉ. उईके यांनी सांगितले. तासिका तत्वावर काम करणारा शिक्षक कायम होऊ शकत नाही. चुकीच्या माध्यमातून आंदोलन करून एक पिढी बरबाद होता कामा नये., असेही त्यांनी नमूद केले.