Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange : नाशिक – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्यासोबत लाखो मराठा समाज बांधव मुंबईतील आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांची जेवणाची व्यवस्था कुठेही कमी पडू नये म्हणून रविवारी जिल्ह्यातील विविध तालुके व शहरातून २० टेम्पो भरून खाद्य पदार्थ मुंबईला पाठविण्यात आले.
मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनादरम्यान खाण्या-पिण्यापासून ते शौचालय, स्वच्छतागृहापर्यंत आंदोलकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. आंदोलकांना जेवण, नाष्टा, चहा मिळू नये म्हणून आझाद मैदान परिसरातील दुकानें बंद ठेवल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला होता. लालबागच्या राजाचे अन्नछत्र देखील बंद ठेवल्याचे त्यांनी म्हटले होते. आंदोलकांना अन्नपाण्याविना अडचणी उद्भवू नयेत म्हणून नाशिकमधून खाण्या-पिण्याचे पदार्थ उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी ग्रामीण भागात एक घर – चार पोळी वा भाकरी, मिरची ठेचा असा उपक्रम राबविला जात आहे.
पोळी, मिरचीचा ठेचा, पापड चटणी, चिवडा, फरसाण असे खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या विविध भागातून संकलित करण्यात आले. मुंबईला पाठवलेल्या सामग्रीत चपाती-भाकरी, ठेचा, लोणचं, पाण्याच्या बाटल्या,राजगिरा लाडू, बिस्किटे,चिवडा, भेळ-भत्त्याची पाकीटे आदींचा समावेश आहे. हजारो नागरिकांचे जेवण होईल, इतकी व्यवस्था नाशिकमधून करण्यात आल्याचे सकल मराठा समाजाने म्हटले आहे. पुढील काळातही मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थ व आर्थिक रसद नाशिकमधून पुरवली जाईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
रविवारी नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता मंदिर प्रांगणात दिंडोरी, गिरणारे, मखमलाबाद, दुगाव, दरी, नाशिकरोड, सिन्नर, येवलासह विविध गाव-खेड्यांतून आलेले खाद्यपदार्थ एकत्रित करण्यात आले. नंतर ही सर्व सामग्री टेम्पोद्वारे मुंबईला पाठविण्यात आली. या अन्नदानासाठी सक्रियपणे मदत करणाऱ्या समाजबांधवांचे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आभार मानण्यात आले. या नियोजनात करण गायकर, नानासाहेब बच्छाव, केशव पाटील, नितीन सुगंधी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सहभाग नोंदविण्याचे आवाहन
ज्या समाज बांधवांना मुंबई येथील आंदोलनासाठी बिस्किट, राजगिऱ्याचे लाडू, पाण्याच्या बाटल्या, चिवडा, भत्ता, कोरडा शिधा पाठवायचा असेल, त्यांनी मुंबई नाका येथील कालिका माता मंदिर येथे जमा करावा. आपली मदत आंदोलनाला निश्चित ताकद देईल. सर्वांनी आपल्या परीने मदत करून आंदोलनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन सकल मराठा समाजाचे करण गायकर यांनी केले. यासाठी पदाधिकाऱ्यांशी ९६७३७५४१४१, ८७६७८८६४९४, ९३२६१९१९११, ९८२२१३३३५५, ७०६६६६९८९४ या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.