नाशिक – शहरातील तीन व शहर-ग्रामीण भाग असलेला देवळाली अशा चार मतदारसंघांसह अन्य विधानसभा मतदारसंघांत तब्बल ३,५३,९४९ इतके मतदार हे दुबार, बनावट आणि स्थलांतरीत स्वरूपाचे आढळून आल्याची तक्रार शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ही नावे कायम राहिल्यास विधानसभेप्रमाणे महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सत्ताधारी महायुती व काही विशिष्ट उमेदवारांना फायदा होईल, त्यामुळे यादीतील अशा मतदारांची नावे वगळून अंतिम चिन्हांकित मतदार यादी तयार करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदार यादीत मोठा घोळ झाल्याचे आरोप विरोधी पक्षांनी केले होते. बनावट मतदारांची नावे घुसवून, काही नावे परस्पर वगळून निकाल प्रभावित करण्यात आल्याची तक्रार संबंधितांकडून सातत्याने होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाने १५ मतदारसंघातील दुबार, मयत, स्थलांतरीत अथवा बनावट मतदारांची यादी प्रशासनाकडे सादर केल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या एक जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार यादीतून या बाबी समोर आल्या.
आगामी निवडणुकांमध्ये हे मतदार एकापेक्षा अनेक ठिकाणी मतदान करून पारदर्शक निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहोचवतील. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडण्यासाठी यादीतील दुबार व बनावट नावे तत्काळ वगळावी, या नावांचा समावेश करताना त्यांचे कोणते रहिवासी व अन्य पुरावे घेतले गेले होते, याचीही सखोल चौकशी व्हावी. मतदार यादीत नाव नोंदणीची सदोष प्रक्रिया करणार्या सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, खा. राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते आदींनी केली.
विधानसभा यादीतील दुबार मतदार यादीबाबत हरकत असेल तर, जिल्हा निवडणूक शाखा आणि महापालिकेबाबत हरकत असेल तर महापालिकेकडून कार्यवाही होईल. विधानसभेच्या यादीचे काम निरंतर सुरू असते. दुबार नाव आढळले तर, निवडणूक आयोगाचे निकष ठरलेले आहेत. त्या निकषात बसत असल्यास नाव वगळले जाते. यात छायाचित्रात साम्यता संगणकीय प्रणालीद्वारे पडताळून एक नाव कमी केले जाते. दुसऱ्या निकषात मतदाराचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, पत्ता, वय, नातेवाईकांची नावे जुळल्यास दुबार नाव असेल तर ते वगळले जाते. परंतु, यासाठी विहित पद्धती निश्चित आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दुबार नावे असतील तर संबंधिताकडून दोनपैकी कुठे मतदान करणार याची नोंद घ्यावी लागते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात कोणत्याही परिस्थितीत एक गठ्ठा पद्धतीने किंवा एकत्रित यादीच्या स्वरुपात हरकती दाखल करता येणार नाहीत आणि असे अर्ज विचारात घेणे आवश्यक असणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.